कृषी महाविद्यालयाची नवीन इमारत सुरू करा

0
9

गडचिरोली,दि.11 – भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा कालखंड लोटला आहे. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी संपावर उतरावे लागत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. ही बाब देशाच्या प्रगतीसाठी मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

विसाव्या शतकात भारत महाशक्ती होणार, असे स्वप्न बघणारे ढोंगी नेत्यांनी जरा विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधी कुणासाठी? असा प्रश्न निर्माण होतो. देशात सर्वात जास्त युवक वर्ग आहे. मात्र या युवकांना शिक्षणाची मुलभूत सुविधा मिळत नसेल तर देश स्वतंत्र झाला की अजूनही गुलामगिरीतच आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
असाच प्रकार महाराष्टÑ राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू आहे. येथील कृषी विषयक शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसोबत घडत आहे. कोट्यवधी रूपयांची कृषी महाविद्यालयाची इमारत बांधून चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. शासनाचे कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च करून या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावून महसूल गोळा करण्यात येवून इमारतीचे बांधकाम करण्यात आले. मात्र या इमारतीचे गेल्या चार वर्षापासून दारसुध्दा उघडण्यात आले नाही. ही इमारत मागील चार वर्षापासून शोभेची वास्तू बनली आहे. ज्या उद्देशाने या इमारतीचे बांधकाम करण्यात आले, त्या विद्यार्थ्यांना आपले शिक्षण मुलींच्या वसतिगृहात असलेल्या चार खोलीत घ्यावे लागत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रॅक्टीकल, लॅब, लायब्ररी, कॅन्टीन, आॅडीटोरियल याबाबतचे शिक्षण नाही. अशाही परिस्थितीत कृषी विषयक शिक्षण घेत असल्याचा गंभीर आरोप करीत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर बसले आहेत.
मात्र विद्यार्थ्यांच्या संपाची प्रशासन अथवा लोकप्रतिनिधींतर्फे अद्यापही दखल घेण्यात आली नाही. नेमके शासन कुणासाठी काम करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत लवकरात लवकर या कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांकरीता महाविद्यालय नवीन इमारतीत सुरू करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.