भंडारा,दि.16 : ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने सत्ता काबिज केली होती. त्यावेळीही आघाडी करून सत्ता स्थापन केली होती आणि आताही आघाडी केली. आगामी अडीच वर्षांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रमेश डोंगरे हे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपद निवडणुकीसाठी सोमवारला दुपारी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेचे अयोजन करण्यात आले होते. अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता राखीव असलेल्या अध्यक्षपदाकरीता काँग्रेसचे रमेश डोंगरे, रेखा वासनिक व भाजपचे नेपालचंद रंगारी यांनी नामांकन दाखल केले होते. उपाध्यक्षपदाकरीता राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर, काँग्रेसचे विनायक बुरडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे व भाजपच्या निलीमा ईलमे यांनी नामांकन दाखल केले होते. दरम्यान काँग्रेसच्या रेखा वासनिक यांनी नामांकन मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे रमेश डोंगरे व भाजपचे नेपाल रंगारी यांच्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात डोंगरे यांना ३९ मते तर रंगारी यांना १२ मते मिळाली. त्यानंतर डोंगरे यांना विजयी घोषित करण्यात आले.
उपाध्यक्षपद निवडणुकीतून विनायक बुरडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे यांनी माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे विवेकानंद कुर्झेकर व भाजपच्या निलीमा ईलमे यांच्यात निवडणूक झाली. कुर्झेकर यांना ३९ मते तर ईलमे यांना १२ मते मिळाली. त्यानंतर कुर्झेकर यांना विजयी घोषित करण्यात आले. सभेला जिल्हा परिषदेचे ५२ सदस्यांसह सात पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी काम पाहिले.
५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे १५, भाजपचे १३, शिवसेना एक आणि अपक्ष चार असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रमेश डोंगरे यांना काँग्रेसचे १९, राष्ट्रवादीचे १५, अपक्ष चार आणि सेनेचा एक अशी ३९ मते मिळाली. तर भाजपला १३ पैकी १२ मतांवर समाधान मानावे लागले. अडीच वर्षापूर्वीपेक्षा भाजपची आताची स्थिती काहीशी कमी झाली आहे.
मागील तीन दिवसांपासून जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे व सुभाष आजबले हे नाना पटोले यांच्या संपर्कात होते. किंबहूना त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टीने दोन दिवसांपासून भ्रमणध्वनी बंद ठेऊन भाजपपासनू दूर होते. दरम्यान आज दीपक मेंढे व सुभाष आजबले हे सभागृहात दिसताच भाजपच्या महिला सदस्यांनी रुद्रावतार दाखविला. महिलांच्या आक्रमक पावित्र्याने मागील दोन दिवसांपासून भाजपापासून दूर पळणाºया दीपक मेंढे यांनी परिस्थिती ओळखून मतदानाच्या अखेरच्या क्षणात भाजपच्या गटात सहभागी होऊन भाजपकडून मतदान केले.
भाजपचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले हे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप नेतृत्त्वावर नाराज होते. त्यामुळे या निवडणुकीत ते नाना पटोले यांच्यासोबत राहिले. भाजपचे गटनेता भालाधरे यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप बजावले. व्हीप घेऊनही सुभाष आजबले यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मतदानाच्यावेळी ते भाजप उमेदवाराला मतदान केले नाही. आजबले यांच्यावर पक्ष कोणती कारवाई करतो आणि काँग्रेस कोणती बक्षिसी देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





