इरई नदीवरील ६५ कोटींच्या केबल स्टेड पुलाचे भूमीपूजन

0
8

चंद्रपूर,दि.25 : पुण्याचे नगरसेवक मुलचे रस्ते बघायला येतात. यवतमाळचे जनप्रतिनिधी बाबा आमटे अभ्यासिकेचा अभ्यास करायला येतात. आता साबरमतीच्या धर्तीवर इरई नदीच्या घाटाचा विकास आपण करणार आहोत. इरई नदीवर मुंबईतील सी-लिंग सारखा पुल पुढच्या दीड वर्षात तयार होणार आहे. पाचवेळा निवडून देणाऱ्या जिल्हावासियांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. तुमचे आशीर्वाद कार्य करण्याची प्रेरणा देतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरला सर्व क्षेत्रात विकासाचे मॉडेल बनविण्याचे आपले स्वप्न असल्याचे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारला केले.
इरई नदीच्या काठावर हजारो लोकांच्या उपस्थितीत आज त्यांनी नव्या व जुन्या चंद्रपूरला जोडणाऱ्या 65.19 कोटी रुपयाच्या दाताळा पुलाचे भूमीपुजन केले. चौपदरी असणाऱ्या या पुलामुळे चंद्रपूरच्या वैभवात भर पडणार असून इरई नदीला कितीही मोठा पूर आला तरी जुन्या व नव्या शहराचा संपर्क तुटणार नाही, अशी उंची या पुलाला मिळत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळणार असून नवीन चंद्रपूर विकसित होण्यासाठी गती येणार आहे. आज या परिसरातील अनेक शाळा, संस्था व नागरिकांच्या वतीने स्वागताच्या भरगच्च सोहळ्यात या पुलाचे भूमीपूजन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, वरोराचे आमदार सुरेश धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती तथा स्थानिक नगर सेवक राहूल पावडे, म्हाडाचे संचालक संजय भिमनवार, अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, सभापती अनुराधा हजारे, माजी महापौर राखी कंचर्लावार आदी उपस्थित होते