आदर्श गाव पाथरीला आता आस सिंचनाची

0
40

गोरेगाव,दि.01 : तालुक्यातील ४००० लोकवस्तीचे पाथरी हे गाव माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी हे दत्तक घेतले आणि येथील गावकऱ्यांनाही विकासाची स्वप्न पडू लागली. या विकासातील एक भाग म्हणून या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची आस निर्माण झाली आहे.कारण या गावातील अनेकांची शेती कटंगी मध्यमप्रकल्पात गेल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केवलभाऊ बघेले हे सातत्याने प्रयत्न करतांनाही दिसून येतात.
पाथरी गावात सर्वच समाजाचे लोक राहतात. गावातील सामाजिक पार्श्वभूमि चांगली आहे. गावाच्या मध्यभागी प्राथमिक शाळा मन मोहून घेते. गावात प्रवेश केल्यावर ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी लावलेले फलक या गावातील नागरिकांचा स्वभाव दर्शवितात. येथील बहुतांश लोक शेतीवर उपजीविका करणारे आहेत. पण जवळच असलेल्या कटंगी प्रकल्पात या गावातील १५० ते २०० लोकांची शेतजमीन गेली. त्यामुळे अनेकांना पोट पाण्यासाठी गाव सोडून जावे लागते.
कटंगी प्रकल्पासाठी शेतजमिनी देवूनही या प्रकल्पाचे पाणी येथील शेतकऱ्यांना मिळणे कठीण झाले आहे. कटंगी प्रकल्प सखल भागात असून येथील शेतजमीन उंच आहे. त्यामुळे इथे शेतीला पाणी मिळत नाही. मात्र लिफ्ट करुन (उपसा सिंचन योजना) प्रकल्पाचे पाणी शेतीला द्यावे अशी शेतकरी आणि गावकऱ्यांची अपेक्षा आहे.शेतीला पाण्याची सोय झाली तर पाथरी, भुताईटोला येथील शेतकरी रब्बी हंगामातही धानासह इतर पिकाचे उत्पादन घेऊ शकतील.
शंभर टक्के हागणदारीमुक्त गाव म्हणून या गावाला २००५ या वर्षी निर्मल ग्राम पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील बगीचा, चिमुकल्यांसाठी विविध खेळणी, ग्रामपंचायती आवारातील सौंदर्याने नटलेला परिसर गाव विकासातील बोलके चित्र आहे. पाथरी गावात आजपर्यंत १४ व्या वित्त आयोग, ठक्कर बाबा योजना माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या निधीतून बरीच विकासाची कामे, २ हजार वृक्ष लागवड, व्यायाम शाळा, एमआयडीसीमध्ये शंभर दिवस काम, मत्स्यपालन, शोष खड्डे इत्यादी विकास कामे झाली आहेत. पाथरी येथील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून लघु उद्योगाच्या प्रशिक्षणासाठी ३०० शेतकऱ्यांना व २०० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष म्हणजे खासदार प्रफुल पटेल यांच्या निधीतून व त्यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. यातून समाजमंदिर, विहीर तोंडी, रस्ते, नाल्या, स्मशानशेड व इतर विकासाची कामे करण्यात आली. तर प्रफुल पटेल यांच्या वाढदिवशी पाथरी येथे दरवर्षी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला, कृषी मेळाव्याचे आयोजन केले जाते.