“ संकल्प समतेचा ” चित्ररथाचा शुभारंभ

0
11

भंडारा,दि. 1 :- जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधारीत “संकल्प समतेचा” या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी काशीनाथ तरकसे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते प्रामुख्याने उपस्थित होते.
संकल्प समतेचा हा चित्ररथ जिल्हयात सर्वदूर फिरणार असून सामाजिक न्याय विभागाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृह, मागेल त्याला प्रशिक्षण योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, रमाई घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनाचा पुरवठा करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी निवासी शाळा इत्यादी योजनांची प्रसिध्दी गावोगावी करणार आहे. नागरिकांनी या योजनांची माहिती घेवून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे यांनी केले आहे.