उमरेड येथे औष्णीक विद्युत प्रकल्पाच्या निर्मितीसंदर्भात सकारात्मक – देवेंद्र फडणवीस

0
7

• उमरेड नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण

नागपूर, दि.4 : उमरेड येथे औष्णीक विद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला विपुल प्रमाणात कोळसा तसेच वीज उत्पादनाचा खर्च कमी होण्यासोबतच या परिसरातील सुमारे दहा हजार लोकांना रोजगार निर्माण होत असल्यामुळे उमरेड वीज प्रकल्पाच्या मंजुरीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे दिली.
उमरेड नगर परिषदेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन तसेच पंडीत दीनदयाल उपाध्याय शॉपींग मल्टीपर्पज हॉल (नाटयगृह) चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, विकास महात्मे, आमदार सुधीर पारवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उमरेडच्या नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरिया, उपाध्यक्ष उमेश हटवार, डॉ. राजू पोतदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आनंदराव राऊत, डॉ. शिरीष मेश्राम, डॉ. शिवाजी मेश्राम, रुपचंदजी कडू, सुप्रसिध्द न्यूरोलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम आदी उपस्थित होते.
नागपूर नागरीक रेल्वेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर-उमरेड या सिमेंट मार्गासोबतच रस्त्याचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी दिला असून पुनर्वसनासाठीही आवश्यक असलेला संपूर्ण निधी देण्यात येईल, परंतु आदर्श पुनर्वसन करा, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्यात.
ग्रामीण व शहरी भागातील चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री जनआरोग्य कक्षाच्या माध्यमातून दूर्धर आजारावरील उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी निधी देण्यात आला असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी जनआरोग्य योजना जाहीर केली असून 50 कोटी लोकांना खाजगी रुग्णालयात 5 लक्ष रुपये खर्चापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
उपसासिंचनासाठी दिवसा 12 तास ही सौरऊर्जेच्या माध्यमातून तर 12 तास औष्णीक ऊर्जेच्या माध्यमातून मिळणार आहे. चिंचघाट उपसासिंचनामुळे साडेसहा हजार शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळू शकेल. आतापर्यंत 5 लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच शहराचे जिओ मॅपींग करण्याचे काम सुरु झाले असल्याचे त्यांनी सां‍गितले.
आमदार सुधीर पारवे यांनी यावेळी उमरेड मतदारसंघातील सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.
उमरेड नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरिया यांनी आपल्या प्रास्ताविकातून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये विविध मूलभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता अभियान यामध्ये नगर परिषदेने उत्कृष्ठ काम केले आहे. त्यामुळे राज्यातील पहिले हागणदारीमुक्त शहर म्हणून राज्य शासनाकडून गौरविण्यात आले. नगर परिषदेच्या या विविध विकास कामांमध्ये रस्ते, मैदान, मुलींचे वसतीगृह, तलावाचे सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेला 25 कोटीच्या निधीची मागणी केली.
लिंबो स्केटिंग क्रीडा प्रकारात गिनिज वर्ड रिकार्ड केल्याबद्दल कु. सृष्टी शर्मा आणि रोलर हॉकी नॅशनल चॅम्पीनशिप स्पर्धेत कु. रिध्दी शर्मा या दोन भगींनींनी प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सुरेंद्र लोढा, प्रदीप कोठारी, डॉ. महादेव मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, श्रीमती जया रामटेके यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीकांत पांडे, मनिषा कोलारकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मुकेश मुदगल यांनी केले.