विचारस्वातंत्र्य जपणारेच सन्मानाचे मानकरी-प्रकुलगुरू-शर्मा

0
12

वर्धा,दि.05 : आपल्यावर टीका करणाऱ्यांचाही आपण जेव्हा सन्मान करतो तेव्हा आपली उंची वाढत असते. दुसºयांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारे आणि आपल्या विचार स्वातंत्र्याला जपणारेच सन्मानाचे मानकरी ठरतात, असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. आनंदवर्धन शर्मा यांनी केले. ते यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या साहित्य व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
स्थानिक सत्यनारायण बजाज जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या समारोहात प्रख्यात शाहीर संभाजी भगत व डॉ. आनंदवर्धन शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष प्रदीप दाते, उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम, सचिव संजय इंगळे तिगावकर, पुरस्कार समिती संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या समारोहात दाते स्मृती संस्थेचा आद्य कांदबरीकार बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार ‘फेसाटी’ या कांदबरीसाठी सांगली येथील नवनाथ गोरे यांना प्रदान करण्यात आला. संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार नांदेडचे ‘शुन्य एक मी’ कार पी.विठ्ठल यांना देण्यात आला. अंजनाबाई इंगळे तिगावकर स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार नागपूरच्या विजया ब्राम्हणकर यांना तर पद्माकर श्रावणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार ‘प्रकाशाचा दिवा’ या कवितासंग्रहाकरिता सावनेर येथील गणेश भाकरे यांना मिळाला. हरिष मोकलकर स्मृती सामाजिक ऋण पुरस्कार कारंजा लाड येथील फासेपारधी समाजात कार्यरत असणारे पर्यावरण अभ्यासक कौस्तुभ पांढरीपांडे यांना देण्यात आला. याशिवाय, शिक्षणमहर्षी बापुराव देशमुख कथासंग्रह पुरस्कार पुण्याचे डॉ. बाळ फोंडके, भाऊराव शिंगाडे स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार मुंबईच्या दीपा मंडलिक तर यशवंतराव दाते स्मृती अनुवाद साहित्य पुरस्कार जयंत कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कवी पी. विठ्ठल यांनी कवी संपूर्ण जग बदलवून टाकत नसला तरी त्याने प्रयत्नच करू नये, असेही नाही. कवी-लेखकांनी समकालीन प्रश्नांचे भान ठेवले पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ‘घर सजवायचं’ ही कविता सादर केली. कादंबरीकार नवनाथ गोरे यांनी मनोगतातून आपल्या लेखनाची वाटचाल मांडली. तर तुकाराम लोकापर्यंत पोचले, आता तुकारामाची आवलीही लोकापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असल्याचे विजया ब्राम्हणकर म्हणाल्या. शहीर संभाजी भगत यांनीही आपल्या भाषणातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जागार केला.
या समारोहाचे प्रास्ताविक प्रा. शेख हाशम यांनी केले. पुरस्कारप्राप्त लेखकांच्या मानपत्रांचे वाचन रंजना दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, संजय इंगळे तिगावकर यांनी केले. अतिथींचे स्वागत हेमंत दाते, महेश मोकलकर, अभिजीत श्रावणे, अभय शिंगाडे, पंडित देशमुख, सुरेश वानखडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. स्मिता वानखडे यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले. या कार्यक्रमाला वर्धेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.