महापुरूषांच्या विचारापेक्षा कोणी मोठा नाही : आ.पुराम

0
10

देवरी,दि.15ःभारत ही संत महापुरुषांची भूमी आहे आणि आमच्या पुर्वजांनी व महापुरुषांनी जो संघर्ष आमच्यासाठी केला. ज्यांच्यामुळे आम्ही आज चांगले जीवन जगत असून आपण सर्वांनी महापुरुषांच्या विचारांना आत्मसात करुन संपूर्ण समाजाचा विकास करावा. कारण महापुरुषांच्या विचारांपेक्षा कोणीही मोठा नाही, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले. .
विदर्भ तेली समाज महासंघ देवरीद्वारा आयोजित संत संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सव व तालुकास्तरीय मेळाव्यात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून जयंती महोत्सवाचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे, अध्यक्ष सुभाष घाटे, स्वागताध्यक्ष झामसिंग येरणे, तर विशेष अतिथी म्हणून उपसभापती गणेशदास सोनबोईर, माजी सभापती सविता पुराम, वनक्षेत्राधिकारी बडवाईक, वनपाल वंजारी, क्षेत्राधिकारी डोरले, महासंघाचे अध्यक्ष भास्कर धरमशहारे उपस्थित होते.
दरम्यान संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायत आदींच्या निवडणुकीत नवनिर्वाचित सभासद व पदाधिकार्‍यांच्या शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत्र प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. संचालन मुख्याध्यापक विनोद गिर्‍हेपुंजे यांनी केले. तर आभार अँड. गंगभोईर यांनी मानले. यशस्वितेसाठी तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.