33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पक्षभेद विसरून विकासात हातभार लावा -आ. पुराम

पक्षभेद विसरून विकासात हातभार लावा -आ. पुराम

0
28

देवरी,दि.05ः-देवरी शहरातील सौंदर्यकरण रस्ते, नाली, पाणी, स्वच्छ परिसर व हागणदारीमुक्त अशा विविध उपक्रमाद्वारे विकास कामे करून देवरी नगरपंचायत ने पूर्ण विदर्भात नाव लौकिक केले आहे. देवरी शहराच्या आणखी उर्वरीत विकास कामांना गती देऊन शहराचा पूर्णपणे विकास करण्याकरिता सर्वांनी आपसातील पक्षभेद विसरून देवरी शहराच्या विकासात हातभार लावण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. .
देवरी नगरपंचायतर्फे एकूण आठ प्रभागातील रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन, दिव्यांग व महिलांकरिता राखीव निधीतून साहित्य वाटप कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुमन बिसेन हे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, बांधकाम सभापती आफताब उर्फ अन्नू शेख, संतोष तिवारी, रितेश अग्रवाल, नेमीचंद आंबीलकर, प्रवीण दहिकर, यादोराव पंचमवार, संजय उईके, माया निर्वाण, भूमिता बागडे, कौशल कुंभरे, दरविंदरकौर भाटीया, कांता भेलावे, कोकीळा दखणे आदी उपस्थित होते.
संजय पुराम म्हणाले, देवरी शहराच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असून आता विशेष रस्ता अनुदानातून २ कोटी रुपये दिले. परत दोन महिन्यात सात कोटी कामाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे बोलून त्यांनी नगर पंचायतकडून सुरू असलेल्या विकास कामांची, स्वच्छतेची व विशेषत: मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या धडाडी कार्यकुशलतेची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांना सदैव तत्पर राहण्याचे आवाहन करून नागरिकांनीही शासनाच्या योजनांचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र व उपस्थित महिलांना कचराकुंड्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कैलास सोनवाने यांनी तर आभार ओमप्रकाश रामटेके यांनी मानले. आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.