सत्संगातून मिळणारे उपदेश प्रेरणादायी : डॉ.बोपचे

0
14
सुखदेवटोली येथे सुखद सत्संग थाटात
गोंदिया,दि.05 : आजच्या आधुनिक युगात मानव समृद्धीचा मार्ग शोधत आहे. समाजातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य घटकांना प्रपंच चालविण्यासाठी चांगले बाबींची आवश्यकता आहे. तेव्हा, अशा सत्संगाच्या माध्यमातून मिळणारे उपदेश सर्वच घटकासाठी चांगले जीवन जगण्यास प्रेरणादायी ठरण्यास लाभदायक ठरत असल्याचे मत माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांनी व्यक्त केले.
श्री सदगुरु कबीर बहुउद्देशीय कृती समिती सुखदेवटोली गोंदियाच्या वतीने आयोजित सुखद सत्संग समारंभात ते बोलत होते. ४ मार्चपासून सुरू झालेल्या या सुखद सत्संग समारोहात असंगदेव साहेब यांच्या मधुरवाणीतून हा कार्यक्रम पार पडला. आयोजित कार्यक्रमात बडनेराचे आमदार रवि राणा, माजी आ. दिलीप बन्सोड, जि.प.सभापती रमेश अंबुले, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, संजयसिंह टेंभरे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.बोपचे यांनी, आजच्या संघर्षमय जीवनात प्रत्येक जण सुखसमृद्धी शोधत असतो. परंतु, निसर्गासमोर कुणाचेही चालत नाही. शासनस्तरावर सर्वसामान्य घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम होत असले तरी त्याचा लाभ सर्वांनाच मिळतो असे नाही. तेव्हा, आपल्याला जे काही मिळते, त्यात समाधान कसे शोधता येईल हे ध्येय ठेवावे तसेच अशा प्रकारच्या सत्संगाच्या उपदेशातून जीवन जगण्यासाठी एक चांगली प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेच्या माध्यमातून आपले जीवन साफल्य करावे, असे सांगितले.
कार्यक्रमाला शहरासह ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सेवा समितीचे येळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गठीत समित्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.