जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध कार्यक्रम

0
23

गोंदिया,दि.१० : जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे ७ मार्च रोजी महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी गोंदिया शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील वैद्यकीय विद्यार्थी, परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थी व या दोन्ही महाविद्यालयातील शिक्षकवृंद यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद होता. महिला आरोग्य व महिला सशक्तीकरण या विषयावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया व परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आले. स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ.गरिमा अरोरा यांनी महिला सशक्तीकरण या विषयावर चर्चासत्र आयोजित केले.
८ मार्च रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणावर पथनाट्य सादर केले. तसेच केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील २३४ महिलांनी लाभ घेतला. सदर तपासणीमध्ये स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मुख कर्करोग व हाडांचे ठिसुळपणा याबाबतची तपासणी करण्यात आली. यानिमित्ताने पॅप स्मीअर सोनोग्राफीची तपासणी सुध्दा करण्यात आली. तसेच महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांबद्दल आरोग्य शिक्षणाची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अपूर्व पावडे, उपअधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन.के.जयस्वाल, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुभाष ठाकरे, शरीरशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.प्रविण जाधव, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे डॉ.देशमुख, डॉ.राजश्री पाटील, डॉ.गरिमा बग्गा, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ.एन.के.जयस्वाल, डॉ.अस्मिता धुर्वे, दंतचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ.मनिंदर जांभुळकर, डॉ.लोकेश मोहणे, अस्थिरोगशात्र विभागप्रमुख डॉ.सुमेध चौधरी, क्ष-किरणशास्त्र विभागाचे डॉ.गौरव बग्गा, विकृतीशास्त्र विभागाचे डॉ.बलवंत कोवे, अधिपरिचारीका श्रीमती अनु नांदणे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लॉयन्स क्लब, गोंदिया राईस सिटी यांनी सहकार्य केले.