इटियाडोह धरणाला पाळीवरील झाडापासून धोका,हटवार यांची तक्रार

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.21 :तालुक्यातील इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरीन झाडे गेल्या अनेक वर्षापासून काढण्यात न आल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची तक्रार इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारीला नाशिकच्या सुरक्षा विभागाकडे लेखी  स्वरुपात केली आहे.
इटियाडोह संरक्षण, संवर्धन समितीचे श्रीधर हटवार यांनी २६ फेब्रुवारीला नाशिकच्या सुरक्षा विभागाकडे लेखी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचे पितळ उघडे पडले. जिल्ह्यातील इटियाडोह हे मोठे धरण आहे. या धरणाच्या पाण्यामुळे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, जिल्ह्यातील शेतीला सिंचन होते. मात्र शासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे धरणाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक वर्षांपासून पाळीवरील झाडे कापलेली नाहीत. वाढलेल्या झाडांच्या मुळांमुळे पाळीची जमीन पोखरुन धरणाचे पाणी झिरपेल व यामुळे पाळीला धोका निर्माण होऊ शकतो. असे निर्देश धरण सुरक्षा विभागाने संबंधित विभागाला दिले होते. याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे या पाळीवर उभी आहेत. या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे हटवार यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते.यावर धरण सुरक्षा विभाग क्र. २ कार्यकारी अभियंत्यांनी इटियाडोह पाटबंधारे विभागाला १२ मार्च रोजी पत्र पाठवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या पत्रात त्यांनी वाढलेल्या झाडांमुळे धरणाचे होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन केले नाही. मात्र पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ मध्ये निरीक्षण केल्याचे स्पष्ट केले. या अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली असल्याचे निदर्शनास आल्याचे पत्रात म्हटले आहे. धरणाची समक्ष पाहणी करुन झाडे काढलेली आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

या संदर्भात माहिती जाणून घेण्याकरीता बाघ इटियाडोह विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दरवर्षी झाडांची कटाई केली जाते.यावेळी तसेही धरणात पाणी नसून त्या झाडामुळे कुठलाही धोका पाळीला नसल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात नाशिकच्या सुरक्षा विभागाकडे झालेली तक्रारीसंदर्भात जो काही अहवाल विभागाला द्यायचा आहे,तो दिला जाईल असे सांगितले.