बोगस पावतीवर करवसुली करणारा ग्रा.प.सदस्य पंजारे पोलीसांच्या ताब्यात

0
11
बोगस पावत्या छापून केली फसवणूक, पोलिसात गुन्हा दाखल, ग्रा.पं.सदस्याला अटक
गोंदिया,दि.01 : ग्राम पंचायतीच्या बोगस पावत्या चक्क फुलचूर ग्राम पंचायतीच्या एका सदस्याने छापून नागरिकांकडून घरटॅक्स वसुल केल्याचे प्रकरण ग्राम पंचायत पुâलचूर येथे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकार्यांच्या तक्रारीवरून ग्रामिण पोलिसांनी गुन्हा नोदवून त्या ग्रा.पं.सदस्याला  आज १ एप्रिल रोजी अटक केली आहे. त्या सदस्याने नाव उमेश छगन पंजारे असे आहे.विशेष म्हणजे य़ाच उमेश पंजारेने दोन तीन वर्षापुर्वी ग्रामपंचायतीमध्ये गोपलानी नामक व्यक्तीचे कर जमा करतांना दीड लाख रुपये जमा न करता कर्मचार्याकडून पावती फाडली होती.त्यावेळी त्यांने पैसे दिल्याचा आरोप करीत ग्रामविकास अधिकार्यालाच फसविले होते.त्यामुळे ग्रामविकास अधिकारी बिसेन यांना आपल्या वेतनातून ती रक्कम भरावी लागली होती.तर फुलचूरपेठचे माजी सरपंच अशोक लिचडे यांच्याकडून ग्रामीण विकास यंँत्रणेकडून रस्ता मंजुर करुन देण्याच्या नावावर डीआरडीएच्या तत्कालीन एका अभियंत्याच्या माध्यमातून 1 लाख 20 हजार रुपये घेतल्याचेही प्रकरण समोर आले आहे.तर उमेश पंजारे यांचे वडील छगन पंजारे हे जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये काम करणारे एक महत्वाचे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे.तर उमेश हा क्रॅिकेटसह इतर बाबीमध्ये सट्टा लावून लवकर श्रीमंत होण्यासाठी असे काम करीत असल्याची चर्चा फूलचूर येथे सुरु झाली आहे.

ग्रा.प.सदस्य उमेश पंजारे
सविस्तर असे की, फुलचूर येथील रहिवासी विजेंद्रसिंह कमलनारायणसिंह नागपुरे यांचा भासा आनंद नागपुरे हा ग्राम पंचायत कार्यालयात २८ मार्च रोजी नाहरकत प्रमाणपत्र मागण्यासाठी गेला असता, त्याला ग्राम पंचायतीचे कर भरण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावर नागपुरे यांनी आपण घरटॅक्स भरलेला आहे. असे सांगितले. तेव्हा ग्रामविकास अधिकारी यांनी  पावतीची मागणी केली. दरम्यान, ती पावती नागपुरे यांनी ग्राम पंचायतीला सादर केली. त्यामध्ये घरटॅक्स पावती क्रमांक ६४,बुक क्रमांक ८ वर ४२ हजार २०५ रूपयाची नोंद नाही. मात्र, ग्राम पंचायतीच्या रेकॉर्डनुसार नागपुरे यांच्यानावाने ६ हजार ५८८ ऐवढे घरटॅक्स उर्वरीत दाखविले. तेव्हा, ही पावती खोटी असल्याचे आनंद नागपुरे यांना ग्रामविकास अधिकारी पी.डी.बिसेन यांनी सांगून पावती कुणाकडून घेतली याची विचारणा केली असता, ग्राम पंचायतीचे वार्ड क्र. ३ सदस्य उमेश छगन पंजारे यांचेकडून ४२ हजार २०५ रूपये देवून घरटॅक्स भरल्याचे सांगितले. त्या पावतीवरून ग्राम पंचायत कार्यालयातील इतर कर्मचार्यांची विचारणा करून रेकॉर्ड तपासणी केली असता, ती पावती खोटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे ३१ मार्च रोजी गावात दंवडी देवून बोगस पावत्या ज्यांच्याकडे असतील. त्यांनी ग्राम पंचायतीला जमा करावे असे आव्हान केल्यावर राजकुमार पांडुरंग भुरे पावती क्रमांक ९८ बुक नं.४ मध्ये घर क्रमांक १२४८ भोगवटदार करवसुली ४ हजार ४५५ रूपये आणि अल्काबाई यांचे पती विजय लबाडे यांनी पावती क्रमांक ९९ बुक नं. ४ घर क्रमांक १२४९ ची ३८०५ रूपयाची पावती सादर केली. त्या पावतीची तपासणी केल्यावर या पावत्यासुद्धा बोगस असल्याचे उघडकीस आले. त्यांनीही या पावत्या ग्रा.पं. सदस्य उमेश पंजारे यांचेकडूनच घेतल्याचे सांगितले. या पावत्यावर लावलेले स्टॅम्पसुद्धा खोटे असून ग्रा.पं.सदस्याला करवसुलीचा कुठलाही अधिकार नसताना ५० हजार ४६५ रूपयाचे अवैध पावत्या फाडून पदाचा दुरपयोग व आर्थिक गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार दाखल करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पी.डी. बिसेन, सरपंच लक्ष्मीबाई कटरे,उपसरपंच आशादेवी मेश्राम व इतर ग्राम पंचायत सदस्यांनी ग्रामिण पोलिस ठाणे गाठले. दरम्यान,थानेदारांनी या तक्रारीची दखल घेत पावत्या फाटलेल्या नागरिकांचे बयाण नोंदविल्यानंतर ग्रा.पं.सदस्य उमेश पंजारे यांचेविरूद्ध भादंवि कलम ४२०,४६८,४७१,४७२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.