डांबराच्या टाकीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू

0
5

साकोली,दि.02  – नागपूर येथील कंत्राटदार एस.के.मेहता यांच्या डांबर हॉट मिक्स प्लाण्टमध्ये तेलाची टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य एक मजूर जखमी झाला. रविवारी सकाळी १०च्या सुमारास साकोली तालुक्यातील चारगाव फाट्यावर ही घटना घडली. अनामिक उके (३२), विकास ब्राह्मणकर (३३, दोन्ही रा. चिखली,ता.सडक अर्जुनी) अशी मृतांची, तर इसन ब्राह्मणकर (६०) असे जखमीचे नाव आहे.
रविवारी सकाळी साफसफाईसाठी लोखंडाच्या टाकीमध्ये आधी विकास उतरला. स्वच्छता करीत असताना तो बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी अनामिक टाकीत उतरला, मात्र विषारी वायुमुळे तोही बेशुद्ध पडला. या दोघांना काढण्यासाठी इसन टाकीत उतरले. मात्र तेही जखमी झाले. अखेर अन्य मजुरांनी तिघांनाही टाकीबाहेर काढले. मात्र अनामिक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर विकास याचा उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. इसन यांच्यावर उपचार सुरू आहेत.