शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करा-सेवा सहकारी संस्थांची मागणी

0
7

सडक अर्जुनी,दि.12 : नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. मात्र ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची सक्ती न करता तो ऐच्छिक करण्यात यावा. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा शुक्रवारपासून (दि.१३) आंदोलन छेडण्याचा इशारा सडक-अर्जुनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षांनी दिला आहे.धान उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्याचा निर्णय त्वरीत न घेतल्यास सेवा सहकारी संस्था व शेतकऱ्यांच्या नेतृत्वात सरकार व विम्या कंपन्याच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, मीताराम देशमुख, जागेश्वर धनभाते, मनोहर काशिवार, ईश्वर कोरे, आकोजी रहेले, तेजराम मुंगलमारे, परसराम सुकारे, के. बी. परशुरामकर, डी.के.राऊत, एन.टी.पारधी, जे.एस.कुरसुंगे, एम.वाय.गायकवाड, डी.एन.गावतुरे, डी.डी.गौतम, धनलाल करचाल, शिवाजी गहाणे, अनिल गुप्ता यांनी दिला आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. बऱ्याच गावांची पैसेवारी देखील कमी आहे. शासनाने तीन तालुके मध्यम स्वरुपाचे दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. सडक अर्जुनी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असून पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत तालुक्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. पीक कर्जाची उचल करताना शेतकऱ्यांना पीक विमा काढणे अनिवार्य केले आहे. कृषी विभागाकडून सुध्दा शेतकºयांना पीक विमा काढण्यासाठी प्रवृत्त केले जाते. पीक विमा कंपन्या हंगामादरम्यान शेतकऱ्यांना पीक विम्या काढण्याची सक्ती करतात. तर बँकाकडून जबरदस्तीने पीक विम्याची रक्कम कर्जातून कपात केली जाते. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असून तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांला नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. शासनाने पीक विम्याची सक्ती न करता ते ऐच्छिक करावे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याची गरज वाटेल ते काढतील. मात्र इतर शेतकऱ्यांना त्याची सक्ती करु नये, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी दिला आहे.