पवनीच्या शेतकर्याची आत्महत्या,तहसिलकार्यालयात ठेवले मृतदेह

0
14

भंडारा,दि.13 : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील वाही येथील शेतकरी सोमेश्वर कुकडे (37 वर्ष) यांनी शेतात गळफास घेऊन गुुरुवारच्या सायकांळी आपल्या शेतात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप केला आहे. मात्र महसूल विभागाने मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्याचे सौजन्यही दाखविले नाही.त्यातच महसुल प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत न दिल्याने कुटूंबियांनी मृतदेह आज शुक्रवारला पवनी तहसील कार्यालयात आणून ठेवला.त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेतकरी आत्महत्या रोखण्यात राज्यातील फडणवीस सरकार हे पुर्णत अपयशी ठरल्याचे आता दिसून लागले आहे.

सोमेश्वर कुकडे यांच्याकडे ६ एकर शेती असून शेतीसाठी सेंट्रल बँकेतून ७५ हजारांचे कर्ज आणि सावकाराकडून २५ हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र उत्पादन न निघाल्याने यावर्षी ३१ मार्च आधी कर्ज फेडू शकले नाही.त्यातच चालू हंगामात कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने विवंचनेत त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.पोलीस व महसुल विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी कुकडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.उत्तरीय तपासणीनंतर कुटुबियांनी मात्र आज पवनी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातच मृतदेह ठेवत जोपर्यंत शासन आम्हाला मदत करीत नाही,तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ माजली आहे.पवनी पोलीसांनी तहसिल कार्यालय परिसरात बंदोबस्त ठेवला असून नागरिकांनी सरकारचा निषेध नोंदविला आहे.