राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे- जिल्हाधिकारी काळे

0
8

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

गोंदिया,दि.२८ : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेवून निवडणूकीसंदर्भात माहिती दिली, त्यावेळी श्री.काळे बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.काळे पुढे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यासंबंधिची अधिसूचना जारी करण्यात आली असून आचारसंहितेची माहिती सुध्दा निवडणूक आयोगाने दिली आहे. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, नायब तहसिलदार (निवडणूक) राजश्री मलेवार, तसेच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.