लोकसहभागातून खांबतलाव खोलीकरणाचा शुभारंभ

0
10

भंडारा,दि.03 : शहराच्या मध्यभागी असलेल्या पुरातन खांब तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ १ मे रोजी महाराष्ट्रदिनी लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आला. नागरिकांनी खांबतलाव खोलीकरण मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन एका महिन्यात खांब तलावातील गाळ काढण्याचा निर्धार केला आहे.
लोकसहभागातून उभी राहिलेली ही चळवळ महिनाभर सुरुच राहणार असून जिल्हा व नगरपालिका प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था व भंडारावासी वेळोवेळी श्रमदान करुन खांब तलावाला पुर्नवैभव प्राप्त करुन देणार आहेत. काळाच्या ओघात लुप्त होत असलेला तलाव पुनर्जिवीत करण्याचा मानस आहे. यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून खांब तलाव खोलीकरणाला प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, तहसिलदार संजय पवार, नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, विजय खंडेरा, संजय एकापूरे, कंत्राटदार मुकेश थोटे, ग्रीनमाईंड संस्था, असर फाऊंडेशन, भंडारा जिल्हा सुधार समिती, श्रीराम सेवा समिती, रोटरी क्लब भंडारा व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
पुरातन खांब तलावातील गाळ काढून तलाव स्वच्छ करा, तसेच तलावाच्या सौंदयीकरणासाठी काठावर वृक्ष लावावे, त्यासाठी एमटीडीसीचे सहकार्य घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी नगर पालिकेला दिल्या. एक महिन्यात गाळ काढण्याचे नियोजन करुन तीन महिन्यात तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करा. जिल्हा प्रशासनाद्वारे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात टाकण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रोत्साहित करावे. या कार्यास लोकसहभाग हा महत्वाचा आहे, तो अधिकाधिक वाढावा,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली. तलावाच्या जागेत झालेले अतिक्रमण हटविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्याबाबत तहसिलदार यांना त्यांनी सूचनाही केल्या. स्वयंसेवी संस्थानी लोकांचा सहभाग घेवून या कामास लवकरात लवकर कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे व जोमाने काम करावे, असेहीते म्हणाले.
मंदिर व तलाव परिसरात येणाºयांनाबसण्याची व विश्रांतीची सोय कशी उपलब्ध करुन देता येईल, याकडे लक्ष दयावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी भंडारा शहरातील नगर परिषद सदस्य, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी व नागरिक उपस्थित होते. जनसहभागातून वृक्षारोपण व वृक्ष संगोपन कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.