आता रेल्वे तिकीटावर स्थानकाचे नाव मराठी भाषेत

0
14

गोंदिया,दि.03 : महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयातील कामकाज मराठीतून करण्याचे निर्देश दिले असले तरी अद्यापही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. मात्र दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने महाराष्ट्र दिनाचे औचित्त्य साधून रेल्वे तिकिटावर रेल्व स्थानकाचे नाव मराठीत छापण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी १ मे महाराष्ट्र दिनापासून करण्यात आली.
भाषा ही त्या परिसराची आणि संस्कृतीची खरी ओळख असते. भाषेचा सन्मान वाढविण्यासाठी आणि तिला अधिक वाव देऊन त्या त्या राज्यात तिला अधिक पोषक वातावरण निर्माण करुन देण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाने घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषेचा अधिक गौरव करण्यासाठी आता रेल्वे तिकिटावर रेल्वे स्थानकाचे नाव इंग्रजी व हिंदीसह मराठी भाषेत छापले जाणार आहे. यामुळे प्रवाशांची देखील सोय होणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणातंर्गत महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकाची नावे आता तिकिटावर स्थानिक भाषेत म्हणजेच मराठी छापण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत रेल्वे तिकिटावर केवळ हिंदी आणि इंग्रजीत रेल्वे स्थानकाचे नाव छापले जात होते. मात्र स्थानिक भाषेचा सन्मान करण्यासाठी आणि भाषेला वाव देण्यासाठी रेल्वे स्थानकाचे नाव तिकिटावर मराठीत छापण्याचा निर्णय घेतला आहे. याची १ मे पासून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळाने अंमलबजावणी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकावर युटीएस (अनारक्षित तिकिट) प्रणाली अंतर्गत आता सर्व अनारक्षित तिकिटावर रेल्वे स्थानकाचे नाव हिंदी व इंग्रजीसह स्थानिक भाषेत असणार आहेत. यासंबंधीच्या सूचना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या मुख्य मंडळ व्यवस्थापक शोभना बंडोपाध्याय यांनी दिले आहेत. त्यामुळे रेल्वे विभाग या उपक्रमात किती दिवस सातत्य ठेवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.