एनआरएचएम कंत्राटी कर्मचार्यांचे ८ मे पासून कामबंद आंदोलन

0
17

गडचिरोली,दि.7 – राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांच्या मागण्यांसंदर्भात शासनाला दिलेला १० दिवसांचा अवधी संपला.मात्र शासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने संघटनेच्यावतीने ८ मे पासून पुन्हा कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.राज्य संघटनेव्दारे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांच्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनात गडचिरोली जिल्हा संघटनेचा संपूर्ण पाठींबा असून जिल्ह्यातील अभियानांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत बांबोळे, सचिव जितेंद्र कोटगले यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येणाºया अधिकारी व कर्मचाºयांचे शासन सेवेत नियमित पदावर समायोजन करण्याकरीता वेळावेळी निवेदन देण्यात आले. मात्र शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्य संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यात ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन उभारण्यात आले होते. त्यानंतर २१ एप्रिल रोजी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलेल्या चर्चेनंतर संघटनेच्या मागण्यांसंदर्भात कार्यवाही सुरू करण्यासाठी शासनाला १० दिवसांचा अवधी देवून सदर आंदोलन स्थगीत करण्यात आले होते.
परंतु शासनाव्दारे दिलेले आश्वासन अद्यापही पाळण्यात आले नसल्याने दिलेला १० दिवसांचा अवधी ७ मे रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्य संघटनेव्दारे सदर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ८ मे पासून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. १४ मे पासून नाशिक ते मुंबईदरम्यान लॉंग मार्च तसेच २४ मे पासून आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदालन करण्यात येणार असल्याचे शासनास कळविण्यात आले आहे.