चालत्या मारुती व्हॅनने घेतला पेट

0
19

सडक अर्जुनी,दि.9 : कोहमारा येथील लग्नसमारंभ आटोपून शेंडा गावाकडे जात असलेल्या मारोती व्हॅनने अचानक पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. दरम्यान गाडीत बसलेल्या वाजत्र्यांनी वेळीच प्रसंगावधान साधत गाडीबाहेर पडल्याने मोठी जीवीत हानी टळली. ही घटना मंगळवारी (दि.८) दुपारी ३ वाजताच्या सुमारास सडक-अर्जुनी शेंडा मार्गावरील केसलवाडा गावाजवळ घडली.
शेंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मसरामटोला येथील बारा वाजंत्री कोहमारा येथील लग्न समारंभ आटोपून स्वगावी मारोती व्हॅन क्रं.एमएच३६/एच-५८०२ ने परत येत होते. दरम्यान केसलवाडा गावाजवळ मारोती व्हॅनने अचानक पेट घेतला. चालकाच्या सतर्कतेने गाडीत बसलेले बाराही वाजंत्री दार उघडून बाहेर पडले. मात्र गाडीच्या कॅरीअरमध्ये बांधून ठेवलेला बॅड व कॅशिओ युनिट जळून खाक झाला.यामध्ये वाजंत्र्यांचे मोठे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार सदर वाहन वाजंत्र्यांनी पूर्ण सिजनसाठी बुक केले होते. या घटनेचीे डुग्गीपार पोलिसांनी नोंद घेतली आहे.