भंडारा नगर परिषद बरखास्त होणार?

0
11

भंडारा,दि.22ः-भंडारा नगर परिषदेचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीत १५ भाजपच्या सदस्यांसह तीन अपक्षांना घेऊन ‘भंडारा न. प. भारतीय जनता पक्ष प्रणीत आघाडी’ तयार करून सत्ता प्रस्थापित केली. नियमानुसार अशी आघाडी करता येत नसल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे भंडारा नगर परिषदेवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. याबाबतची तक्र ार सामाजिक कार्यकर्ते सुकराम देशकर यांनी शासनाला केली होती.
१८ डिसेंबर २0१७ ला भंडारा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सुनील मेंढे हे अध्यक्षपदी निवडून आले. याशिवाय भाजपचे १५, अपक्ष ४ व अन्य पक्षाचे १४ सदस्य निवडून आले. सत्ता स्थापनेसाठी सुनील मेंढे यांनी १५ भाजपचे सदस्य व तीन अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन १९ नगरसेवकांची ‘भंडारा न.प. भारतीय जनता पक्ष प्रणीत आघाडी’ या नावाची नवीन आघाडी केली. ही आघाडी बनविताना या सर्व१९ नगरसेवकांकडून स्टॅंपपेपरवर अशी आघाडी स्थापन केल्याचे शपथपत्र तयार करून ते जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ चे तरतुदीनुसार निवडणुकीनंतर अशी आघाडी बनविता येत नाही. तशी आघाडी बनविल्यास त्या आघाडीचे सदस्यत्व स्वीकारणारे सदस्य, अध्यक्ष, नगरसेवक पदावर राहण्यास अपात्रठरतात. तेव्हा ज्या दिवशी ही आघाडी बनली त्याच दिवशी सदर सदस्य अपात्र ठरले.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या तरतुदीनुसार एकाचवेळी नगर परिषदेचे अध्र्यापेक्षा अधिक नगरसेवक अपात्र ठरल्यास वा पदे रिक्त झाल्यास ती नगर परिषद विसजिर्त करून नव्याने सार्वत्रिक निवडणूक घ्यावी लागते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुकराम देशकर यांनी शासनाला तक्र ार केली होती. या तक्र ारीची दखल घेत नगर विकास मंत्रालयाने जिल्हाधिकार्‍यांना याप्रकरणाची चौकशी करून मुद्देनिहाय चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.