गडचिरोलीचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडकेना अटक

0
11

गडचिरोली-अल्प मुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात बोगस विद्यार्थी दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळ्यात गडचिरोलीचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर येथील त्यांच्या राहत्या घरातून रविवारी गडचिरोली पोलिसांनी त्यांना अटक केली. याबरोबरच सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तुकाराम बरगे यांनाही अटक झाली आहे. या घोटाळ्यात यापूर्वी संस्थाचालक व प्राचार्य अशा तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

युजीसीने वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीला २४ अल्प मुदतीचे तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम चालविण्याची परवानगी २०१०मध्ये दिली होती. त्यानुसार गडचिरोलीसह राज्यभरात २००पेक्षा जास्त संस्थांनी व्यावसायिक अभ्यासक्रम चालविण्यासाठी विद्यालये सुरू केली. यासाठी आदिवासी आणि समाजकल्याण विभागाकडून प्रत्येकी ३५ हजार रुपये शिष्यवृती या संस्थांना देण्यात आली. गडचिरोलीसह राज्यभरात २०२ विद्यालयांनी आदिवासी आणि समाजकल्याण या दोन्ही विभागाकडे तब्बल १६ हजार ७५६ विद्यार्थी दाखविले. त्यात या दोन्ही विभागाकडून ९ हजार २०७ विद्यार्थ्यांच्या नावावर या विद्यालयांनी एकूण ३१ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांची उचल केली. गडचिरोली जिल्ह्यात ९० टक्के बोगस विद्यार्थ्यांच्या नावावर ही रक्कम उचलण्यात आल्याचे स्पष्ट होताच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली. यातूनच मेंडके यांना अटक करण्यात आली आहे.

मेंडके हे मार्च २०११ -१४ या तीन वर्षांच्या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. २०१४च्या जून महिन्यात त्यांची गडचिरोली येथून नागपूरला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून बदली झाली. मेंडके यांच्या बदलीनंतर प्रथमच आयएएस दर्जाचे अधिकारी पी. शिवशंकर यांची प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या कार्यकाळात हा शिष्यवृत्ती घोटाळा आणला.

चौकशीविनाच दिली रक्कम?

वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीने पत्र पाठवून २०१३-१४ या वर्षासाठी कुठल्याही संस्थेला परवानगी दिली नसल्याचे मान्य केले आहे. राज्यात १३ जिल्ह्यातील ११३ विद्यालयांना समाजकल्याण विभागाकडून तर ८९ विद्यालयांना १५ आदिवासी प्रकल्प कार्यालयाने ही रक्कम परवानगीसंदर्भातील चौकशी न करता दिल्याचेही समोर आल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.