युग चांडक खटल्याची आज सुनावणी

0
10

नागपूर-युग चांडक हत्याकांडातील आरोपी अरविंद सिंग याच्या वकिलांनी सुनावणी प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याने या खटल्याची सुनावणी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर सोमवार, २३ फेब्रुवारीपासून या खटल्याची सुनावणी होणे अपेक्षित आहे. याप्रकरणी सध्या साक्षीदारांचे बयान नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

युग चांडक प्रकरणाच्या यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान हर्ष फिरोदिया या साक्षीदाराचे बयान नोंदविले जात होते. या गुन्ह्यातील आरोपी अरविंद सिंग याचा कबुलीजबाब नोंदविताना हर्ष फिरोदिया तेथे उपस्थित होते. उलटतपासणीदरम्यान बचावपक्षाचे वकील मनमोहन उपाध्याय यांनी विचारलेल्या काही प्रश्नांवर प्रधान जिल्हा न्यायाधीश के. के. सोनावणे यांनी हरकत घेतली.

त्यावर न्यायाधीश सोनावणे, अॅड. मनमोहन उपाध्याय आणि अॅड. प्रमोद उपाध्याय यांच्यामध्ये वाद झाला. ‘आम्हाला ही सुनावणी या न्यायालयापुढे चालविण्याची इच्छा नाही. ती अन्य न्यायालयात चालविण्यात यावी, याकरिता आम्ही हायकोर्टात अर्ज करणार आहोत,’ असा आक्षेप या सुनावणीदरम्यान अरविंद सिंगच्या वकिलांनी घेतला होता. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी २३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली होती. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी या सरकारी पक्षाची, अॅड. राजेश अग्रवाल हे आरोपी राजेश डवारे याची, तर आरोपी अरविंद सिंग याची बाजू अॅड. मनमोहन उपाध्याय आणि प्रमोद उपाध्याय मांडत आहेत. अॅड. राजेंद्र डागा हे चांडक परिवारातर्फे सरकारी पक्षाला सहकार्य करीत आहेत.