पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज करा-सभापती श्रीमती सोनेवाने

0
12

गोंदिया,दि.१६ : सन २०१८-१९ या वर्षात पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद,गोंदिया अंतर्गत बिगर आदिवासी योजना, आदिवासी क्षेत्र उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील योजना व विशेष घटक योजनेत प्राप्त तरतुदीतून वयक्तीक लाभाच्या योजनेकरीता इच्छुक पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार दुधाळ जनावरांचे गट वाटप- या योजनेकरीता अनुसूचित जाती व नवबौध व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर चालू वर्षात एक व सहा महिन्यानंतर एक असे एकूण दोन दुधाळ जनावरे वाटप करण्यात येते. शेळी गट वाटप- या योजनेकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेळी गट वाटप करण्यात येते. दुधाळ जनावरांना पशुखाद्य वाटप- या योजनेकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर पशुखाद्यांचे वाटप करण्यात येते. पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम- या योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व तांत्रिक माहिती तीन दिवसाचे प्रशिक्षणाद्वारे नि:शुल्क देण्यात येते. एक दिवसीय कुक्कुट विकास कार्यक्रम- या योजनेतून सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदानावर सुधारीत जातीचे १०० एकदिवसीय कुक्कुट पिल्लांचे गट वाटप करण्यात येते. वैरण विकास कार्यक्रम- या योजनेतून सर्वसाधारण लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदानावर सुधारीत जातीचे वैरण/गवताचे बियाणे वाटप करण्यात येते.
वरील योजनांकरीता महिला व अपंग लाभार्थ्यांना शासकीय निकषानुसार लाभ देण्यात येईल. इच्छुक शेतकरी, गोपालक व बेरोजगारांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) तसेच नजिकच्या पशुवैद्यकीय दवानाखान्याशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जुलै २०१८ पर्यंत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) तसेच नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज सादर करावे असे आवाहन गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती शैलजा सोनेवाने यांनी केले आहे.