मासेमारी संस्थांची १८.५0 लाखांची लीज माफ

0
12

भंडारा,दि.22ःःमागील वर्षीच्या पावसाळयात कमी पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातील तलावात पाणी साठा कमी प्रमाणात झाला. त्यामुळे मासेमारी सहकारी संस्थांना अपेक्षित मत्स्यव्यवसाय झाला नाही. या कारणाने लिजची रक्कम माफ करण्याची मागणी संस्थांनी केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करुन सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेने सवार्नुमते ही लिज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव ११५४, लघु सिंचन तलाव १४४ व पाझर तलाव १५ असे एकूण १३१३ तलाव आहेत. या सर्व तलावात मत्स्य व्यवसाय करण्यात येतो व मत्स्य व्यवसाय करणारे समाज बांधवांचा मासेमारी हा मुख्यत: उपजिविकेचा व्यवसाय आहे.
कृषि विभागाच्या अहवालानुसार, मागील वर्षी केवळ ६७ टक्के पाऊस झालेला आहे. अल्पवृष्टीमुळे कोणतेही तलाव पूर्णपणे भरलेले नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे समाज बांधव व त्यांचे सहकारी संस्थांच्या उत्पादनात वाढ होऊ शकली नाही. या दरम्यान मत्स्य व्यवसाय करणारे समाज बांधवांना व त्यांचे संस्थांना फार आर्थिक नुकसान झाले असल्यामुळे त्यांनी जुलै २0१७ ते ३0 जून २0१८ पर्यंत रक्कम रुपये १८.५0 लक्षची लिज माफ करण्याकरीता विनंती केली. त्यानुसार सदर विषयाची तात्काळ दखल घेवून सदर विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आला. मत्स्य व्यवसाय सभापती व सर्व जिल्हा परिषद सदस्य यांचे संमतीने विषय मंजूर करुन रक्कम रुपये १८.५0 लाखाची लिज माफ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.