ग्रामसंघाच्या महिलांना चारचाकी वाहनांचे वितरण

0
20
अर्जुनी मोरगाव,दि.24ः-शासन महिलांचे सक्षमीकरण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतेपरी प्रयतन करीत आहे. महिला उद्योगाधद्यांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा स्तर उंचावून योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. त्यासाठी महिला बचत गट व  ग्रामसंघातील महिलांना मुद्रा लोन व इतर कर्ज देवून उद्योगधंद्याकडे वळावे व आपली प्रगती साधावी. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कार्य शासनस्तरावर होत असून  शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून महिलांना जीवनस्तर उंचावून गावविकासात आपली भूमिका बजवावी, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान गोंदिया तथा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं.स.अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने (दि.२३) कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित उपजिविका ग्रामीण एक्सप्रेस योजना अंतर्गत चारचाकी वाहन हस्तांतरण कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जि.प.अध्यक्ष सिमाताई मडावी तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, नामदेव कापगते, केवळराम पुस्तोडे, जि.पसदस्य तेजुकला गहाणे, मंदा कुंभरे, पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर, प्रकल्प संचालक मुंडे, अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, रिता बावणकर, लायकराम भेंडारकर, डॉ.गजानन डोंगरवार, विनोद नाकाडे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन व माल्यार्पण करून करण्यात आले. दरम्यान  पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेतंर्गत एकता ग्रामसंघ धाबेटेकडी, एकता ग्रामसंघ गौरनगर, राणी ग्रामसंघ बोरटोला, साक्षी ग्रामसंघ येगाव, सावित्रीबाई फुले ग्रामसंघ भिवखिडकी, भरारी ग्रामसंघ महागाव या सहा ग्रामसंघाच्या महिलांना चारचाकी वाहनांचे  वाटप करण्यात आले. दरम्यान अभियान व्यवस्थापक अनिल गुंजे यांनी अभियानाविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. तसेच विविध योजनांची माहिती देवून ग्रामीण महिलांना लाभ घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रविण भांडारकर यांनी तर आभार रेशीम नेवारे यांनी केले. कार्यक्रमाला उमेद ग्रामसंघाच्या महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेद राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष गोंदिया व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अर्जुनी मोरगाव यांनी परिश्रम घेतले.