कर्जाची परतफेड करण्यात महिलांची प्रामाणिकता- संजय पुराम

0
21

अर्धनारेश्वरालय येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा
गोंदिया,दि.२८ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ बचतगटातील महिलांनी घेतला पाहिजे. बचतगटातील महिला आता संघटीत झाल्या असून स्वावलंबनाच्या दृष्टीने त्या उद्योग व्यवसायाकडे वळत आहेत. बँकांनी आता त्यांना पूर्णपणे स्वावलंबी करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दयावे. कारण महिला हया कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने २७ जून रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थानात आयोजित सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावाचे उदघाटक म्हणून श्री.पुराम बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्रीमती लता दोनोडे, पं.स.उपसभापती दिलीप वाघमारे, जि.प.सदस्य विजय टेकाम, श्रीमती दुर्गाबाई तिराले, पं.स.सदस्य श्रीमती प्रतिभा परिहार, तहलिसदार प्रशांत सांगळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्लारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे यांची उपस्थिती होती.
श्री.पुराम पुढे म्हणाले, माविमच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचतगटाच्या स्थापनेतून महिलांचे मोठ्या प्रमाणात संघटन झाले आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिला आता सर्वच क्षेत्रात पुढे येत आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूला मार्केटींग करण्यासाठी वन विभागाकडून जागा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष्य देणे गरजेचे आहे. बचतगटातील महिलांनी प्रधानमंत्री जनधन योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्याकरीता बँकेत खाते उघडणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाच्या जीवन सुरक्षेची हमी शासनाने घेतली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेची ग्रामीण भागात जनजागृती करणे गरजेचे असून महिलांनी आता आपण कोणत्याही क्षेत्रात मागे नाही असे समजून काम करावे असे त्यांनी सांगितले.
डॉ.बलकवडे म्हणाल्या, महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी आपल्या परिश्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या बचत केली पाहिजे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नसल्यामुळे महिला पुढे येत नाही. त्यामुळे महिलांनी आपल्या शंकाचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. बचतगटातील महिलांच्या मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.सिल्लारे म्हणाले, महिलांच्या विकासात बँकेचे सहकार्य मोठ्या प्रामाणात लाभत आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी बँकेचे शाखा प्रबंधक निश्चितच आपल्याला समुपदेशन करुन सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत. सालेकसा तालुक्यात ग्रामीण बँक व बँक ऑफ महाराष्ट्र अशा दोन शाखा आहेत. या बँकेत भेट देवून प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ज्यांनी बँकेत खाते उघडले नाही त्यांनी लवकरात लवकर आपले खाते उघडावे, जेणेकरुन या योजनेचा संबंधितांना लाभ घेता येईल. सोबतच प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना व प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ घेण्यात यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.बीनची तपासणी केली व कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिलांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रेरणा पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच गाव हागणदारीमुक्त करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून संस्कार ग्रामसंस्था कुणबीटोला, धनश्री ग्रामसंस्था धानोली, विकास ग्रामसंस्था गिरोला, कचारगड ग्रामसंस्था जमाकुडो, अपेक्षा ग्रामसंस्था झालिया, दर्पण ग्रामसंस्था लोहारा यांचा सत्कार करण्यात आला तसेच जयसेवा लोकसंचालीत साधन केंद्र यांना गौणउपज खरेदी केंद्राकरीता १ लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमास न.प.बांधकाम सभापती उदेलाल जैतवार, आरसीटीचे संचालक श्री.पहिरे, श्री.रिंगणगावकर, श्री.भास्करराव, श्री.अप्पाराव तसेच सालेकसा तालुक्यातील बचतगटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश मार्कंड, प्रदिप कुकडकर, योगेश वैरागडे, प्रफुल अवघड, प्रिया बेलेकर, एकांत वरघने व अर्धनारेश्वरालय देवस्थानचे अध्यक्ष श्री.वरकडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन शालू साखरे यांनी केले.