पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप

0
9

गोंदिया,दि.७ : जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहिमेअंतर्गत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत आज ७ जुलै रोजी सडक/अर्जुनी येथील तेजस्वीनी लॉन येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी पं.स.सभापती गिरधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सदस्य शिला चव्हाण, डॉ.जैन व डॉ.चौरसीया उपस्थित होते.
दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी यापूर्वी बराच त्रास सहन करावा लागत होता. आता दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तयार झाल्यामुळे त्यांना संजय गांधी निराधार योजना, अपंग शिष्यवृत्ती, रेल्वे, एस.टी.सवलत, रमाई घरकूल, अपंग विवाह अनुदान, कृत्रिम अवयव व साहित्य इत्यादी शासकीय योजनांचा लाभ घेता येईल असे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र १०० टक्के वाटपाचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. त्यानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मिशन झीरो पेंडन्सी या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्धार पालकमंत्री यांनी केला आहे. यावेळी अनेक दिव्यांग बांधवांना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी केले. संचालन अभिजीत राऊत यांनी केले, उपस्थितांचे आभार गजानन वाघ यांनी मानले.