मुसळधार पावसाने शास्त्री वॉर्डाला आले तलावाचे स्वरूप!

0
16
नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरले
नगर परिषदेचा अनियोजनाचा फटका
शास्त्री वॉर्डवासीयांचा आंदोलनाचा इशारा
गोंदिया,दि.17ः- जिल्ह्यासह शहरात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र मुसळधार पावसाने शहरातील प्रभाग क्र.२० मधील शास्त्री वॉर्डात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाने वॉडार्तील महालक्ष्मी राईस मिलच्या मागील परिसर पाण्याने तुडूंब भरला आहे. नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात परिसरात साचून आहे.  नगर परिषदेचा अनियोजन बध्द कारभाराचा फटका येथील नागरिकांना सोसावा लागत आहे. या वॉर्डात नाल्यांचे योग्य व्यवस्थापन नसल्याने स्थिती चांगलीच बिघडली आहे. कित्येक वर्षांपासून याकडे येथील नगरसेवक, नगर परिषद  व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यात आले मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केले जात आहे. समस्या मार्गी लावून रस्ता काढण्यात यावा, अन्यथा परिसरातील नागरिक तीव्र आंदोलन करणार, अशा इशाराही यावेळी देण्यात आला.
शहरातील मध्यभाग म्हणून शास्त्री वॉर्डाची ओळख आहे. राज्य महामार्गाला लागून असलेला हा परिसर कित्येक वर्षांपासून विकासाच्या प्रतिक्षेत आहे. शास्त्री वॉर्डात महालक्ष्मी राईस मागील परिसरात रस्ता अवरूध्द असून ये-जा करण्याचे कोणतेही साधन येथील नागरिकांना उपलब्ध नाही. मागील कित्येक वर्षांपासून या परिसरात रस्ता व सांडपाणी वाहक नाल्यांच्या समस्येने ग्रस्त आहे. असे असूनही नगर परिषदेने याकडे लक्ष दिले नाही. येथील नगरसेवक आपली  जबाबदारी दुसºया नगरसेवकांकडे थोपवून टाळाटाळ करीत आहेत. अशात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस येत आहे. यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. काल  व आज  आलेल्या पावसाने परिसरातील नागरिक सुखराम खोब्रागडे, राजु टोल, अशोक येटरे यांच्यासह अनेकांच्या घरात दीड ते दोन पाणी शिरले. याबाबत नगरसेवकांना माहिती दिली असता त्यांनी दुसºया नगरसेवकाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आज  येथील नागरिकांनी पुन्हा परिस्थिती नगरसेवक व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चंदन पाटील यांच्या भ्रमणध्वनीवरून सांगितले. यानंतर मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी परिसराला भेट देवून नागरिकांच्या समस्या ऐकल्या. व परिसराची पाहणी केली. दरम्यान प्रभागातील नरसेवक सुनिल तिवारी व  राजेश कापसे यांनी सदर प्रकार मुख्याधिकारी पाटील यांच्या निर्देशनास आणून दिला. यावर मुख्याधिकाºयांनी नगर परिषदेच्या सभेत ठराव घेवून रस्ता काढण्याची सर्वोपरी उपाय करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले. यावेळी सुखराम खोब्रागडे, राजु टाले, भुरू शेख, आरीफ शेख, प्रशांत मोरघडे, अशोक येटरे, बबलु रहांगडाले, युनूस शेख, सुरेश येटरे, अरविंद राऊत, मयूर कोठ्ठेवार, अतुल बैस, छोटु गव्हारे, अनिल उके, शकील शेख, राजु सोनवाने, कृपेश कावळे, नरेश करेले, शाहिद शेख, युसूफ शेख, मोनू सोनवाने यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. त्यामुळे न.प.मुख्य अधिकारी चंदन पाटील यावर कोणती उपाययोजना करतात, याकडे शास्त्री वॉर्डवासीयांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे शास्त्री वॉर्डातील महालक्ष्मी राईस मिलच्या मागील भाग राज्य महामागार्ला लागून आहे.  महामागार्ला लागून काही बड्या व्यापाºयांच्या जमिन आहे. त्यामुळे येथील रस्ता अवरूध्द झालेला आहे. त्यामुळे रस्ताअभावी येथील नागरिकांची कोंडी झालेली आहे. असे असतानाही या व्यापाºयांच्या घरगुती वादात परिसरातील नागरिक भरडले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याकडे लक्ष देवून नगर परिषद प्रशासनाने रस्ता काढून नाल्या मोकळ्या कराव्या, अन्यथा परिसरातील नागरिक तिव्र आंदोलन करणार, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
……………..
मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्याकडून परिसराची पाहणी
शहरातील प्रभाग क्र.२० मधील शास्त्री वॉर्ड हा शहराचा मध्यभाग आहे. असे असूनही शास्त्री वॉर्डातील महालक्ष्मी राईस मिलच्या मागील भाग विकासाच्या प्रतिक्षेत आहे. या भागात जाण्यास रस्ताच नसल्याचे नागरिकांची कोंडी झाली आहे. अशात या भागात पाणी साचल्याची माहिती मिळताच, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चंदन पाटील यांनी भेट देऊन परिसरातील नागरिकांच्या समस्या ऐकल्या. व नगर परिषदेच्या आगामी सभेत ठराव घेवून येथील मागण्यांची पुर्तता करण्यात येईल, तसेच या भागातून रस्ता काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.