विधान भवनाबाहेर तरुणाचा व महापालिका कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

0
8

नागपूर,दि.१९ः:- नागपूरमध्ये विधान भवनासमोर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एका तरुणाने अशाप्रकारचे कृत्य केले आहे. विधान भवनासमोर आशिष आमदरे या तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका टँकर चालकाने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांत करुनही कारवाई करण्यात आली नाही. तसेच, यासंबंधीची तक्रार नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा करण्यात आली आहे. तरी सुद्धा यावर कारवाई करण्यात आली नाही. या निषेधार्थ आशिष आमदरे याने विधानभवनासमोर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आशिष आमदरे याला पोलिसांनी रोखले आणि ताब्यात घेतले आहे.

आपल्याला नोकरीवर घेण्यात यावे, या मागणीसाठी महापालिकेतील प्रकाश बरडे या कर्मचाऱ्याचा विधान भवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या घटनेने काही काळ खळबळ माजली होती.2001 मध्ये महापालिकेने नोकर भरतीची जाहिरात दिली होती. या नोकर भरतीत एकूण 124 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यामध्ये काहींना अर्ज न करताच नोकरीवर घेण्यात आले. काहींना अर्ज करूनही मुलाखतीला बोलावण्यात आले नाही. असे एकूण 18 जण होते.

नोकर भरतीत घोटाळा झाल्यामुळे ही नोकर भरती रद्द करण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 106 जणांना परत नोकरीवर घेण्यात आले, तर 18 जणांना कामावर घेण्यात आले नाही. यातील एका कर्मचाऱ्याचे निधन झाल्याने आता 17 कर्मचारी आहेत. यापैकी एक प्रकाश बरडे आहे. 2106 मध्ये या 18 जणांना नोकरीत घेण्याचा ठराव पारित करून महापालिकेने सरकारकडे पाठवला. परंतु सरकारने आपणच निर्णय घ्यावा, असे सांगत ठराव महापालिकेकडे परत पाठवला. तेव्हापासून हे 17 कर्मचारी संघर्ष करीत आहेत.प्रकाश बरडे यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. बरडे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. त्यातूनच बरडे यांनी बुधवारी विधान भवनाबाहेर पत्रके भिरकावीत “मुख्यमंत्री मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. मात्र सतर्क झालेल्या पोलिसांनी त्यांना तत्काळ अटक केली.