दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील जागा स्मारकासाठी हवी

0
14

नागपूर,दि.23 : पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश द्वारासमोरची जागा स्मारकासाठी अतिशय आवश्यक आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ही ३.८४ एकर जागा देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवून येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी ही जागा दीक्षाभूमीला हस्तांतरित करावी, अशी मागणी रिपाइं नेते व दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सविस्तर चर्चा करून निवेदनाद्वारे केली.
पवित्र दीक्षाभूमी येथे दर वर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन, आदी दिनी लाखोंच्या संख्येत अनुयायी येत असतात. तर दररोज हजारो अनुयायीसुद्धा येत असतात. दीक्षाभूमी स्तूपात जाण्यासाठी चार प्रवेशद्वार असून पूर्व, पश्चिम आणि दक्षिण प्रवेशद्वार अनुयायांना आत व बाहेर जाण्यास सोईचे ठरतात मात्र उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोर फक्त सहा फुट जागा असल्याने लाखो अनुयायांना बाहेर पडण्यास प्रचंड त्रास होत असून चेंगराचेंगरी होण्याची तीव्र शक्यता आहे. उत्तरेकडील प्रवेशद्वारासमोर भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ३.८४ एकर असलेली जागा ही दीक्षाभूमी स्मारक समितीने गेल्या ४० ते ४५ वर्षापासून शासनाला मागितली आहे. यासाठी त्यांनी वेळोवेळी राज्य व केंद्र शासनाकडे पत्रव्यवहार केलेला असून २०१८ च्या दीक्षाभूमी नाविण्यपूर्ण विस्तारीकरण अहवालात शासनाने नियुक्त केलेली डिझाईन असोसिएट (नोएडा), यांनी सुध्दा ही जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे तसेच नागपूर जिल्हाधिकारी यांनी सुध्दा ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने सुद्धा याचे गांभीर्य शासनाच्या निदर्शनास आणले आहे.