देवरीत पोलिस विभागातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन

0
25

देवरी,दि.23- ‘नक्षल दमन सप्ताह’ अंतर्गत देवरी तालुक्यातील देवरी आणि बोरगाव बाजार येथे पोलिस विभागाच्या वतीने ‘नक्षलवाद- लोकशाही व विकासाचा शत्रू ‘ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहासंचालक अंकुश शिंदे आणि गोंदियाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळपाटील यांच्या मार्गदर्शाखाली स्थानिक छत्रपती शिवाजी विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवरी येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले हे होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मनोज भूरे,टी आर देशमुख, पत्रकार सुरेश भदाडे, देवरीचे ठाणेदार कमलेश बच्छाव, देवरी नक्षलसेलचे चक्रधर पाटील , पत्रकार अश्विन मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत शिवाजी विद्यालय, मनोहरभाई पटेल विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय डवकी, शासकीय आश्रमशाळा शेंडा, वसंत विद्यालय डोंगरगावसडकच्या 44 कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदविला. यावेळी स्पर्धक विद्यार्थ्यांनी वरील विषयावर आपले विचार अत्यंत खुलेपणाने व्यक्त केले. प्रत्येक स्पर्धक वक्त्याने नक्षलवाद हा देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीला कसा बाधक आहे, हे उपस्थितांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काही स्पर्धकांनी शासकीय उणिवा ह्या पोलिसांना आपले कर्तव्य बजावत असताना कशा आड येतात, यावर सुद्धा आपले मत मांडले. प्रत्येक भारतीयाने आपली उर्जा सकारात्मक कार्यात लावून गरीब आणि आदिवासी भागातील अल्पशिक्षित नागरिकांच्या विकासात आपला हातभार लावला पाहिजे, असेही या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. या स्पर्धेच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिक यांच्याच सुसंवाद प्रस्थापित होत असल्याचे अधोरेखित झाले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी ढोले यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचे उत्तम प्रबोधन केले. याभागातील नागरिक हे प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याभागात अनेक उर्जावान व्यक्तीसाधन असल्याचे सांगत त्यांना सकारात्मक सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान या स्पर्धेत चतुष्का कोमल मेश्राम, भावना भोजराज घासले आणि मीनाक्षी रवींद्र कावळे या विद्यार्थींना अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय पुरस्कार देऊन गौरान्वित करण्यात आले. संचलन कुलदीप लांजेवार यांनी केले.
दरम्यान, तालुक्यातील बोरगाव बाजार येथील शासकीय आश्रमशाळेत चिचगड पोलिस स्टेशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 22 विद्यार्थी सहभागी झाले होते. रुपा मेश्राम, राहुल कोसरकर,प्रियंका नेताम या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितिय आणि तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्यांना चिचगडचे ठाणेदार नागेश भास्कर यांनी मोमेंटो देऊन सत्कार केला. पोलिस ठाणे हद्दीतील इतरही ठिकाणी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 59 स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला आश्रमशाळेचे प्राचार्य भाकरे, मुख्याध्यापक खांडवाये,एन जी गावळ पोलिस निरीक्षक माळी आदी मान्यवर उपस्थित होते. संचलन पोलिस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी केले.