मेगा भरतीआगोदर गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्वरत करा

0
9

गडचिरोली,दि.26- सत्तेत येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्तेत येऊन ४ वर्षे झाल्यानंतर त्या’ आश्वासनाचे काय झाले? असा सवाल करुन आधी आरक्षण पूर्ववत करा आणि नंतरच मेगा भरतीची प्रक्रिया राबवा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने केली आहे.

अलिकडेच शासनाने मेगा भरतीची घोषणा केली आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण केवळ ६ टक्के असल्याने या मेगा भरतीला लाभ ओबीसी प्रवगार्तील बेरोजगारांना मिळणार नाही, हे लक्षात येताच गडचिरोली तालुक्यातील सुशिक्षित ओबीसी युवकांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात उपजिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले.शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे, जिल्हाकार्याध्यक्ष किरण कटरे, तालुकाध्यक्ष सूरज डोईजड, करणं ढोरे , शुभम चापले, राहूल भांडेकर, विकेश नैताम, निशिकांत नैताम, राकेश पारधी, नितीन कोतकोंडावर, शुभम धानफोले, नितेश मेश्राम,मयूर गावतुरे, पंकज खोबे, हर्षद वैरागडे, शुभम बांगरे, रजत धंदरे, राकेश चुधरी, मिथुन रणदिवे, मिजार खोब्रागडे, हर्षद कोठारे आदींचा समावेश होता.

२०१४ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण ६ टक्क्यावरून पूर्ववत १९ टक्के करण्याचा करण्याचा निर्धार चामोर्शी येथे झालेल्या जाहीर सभेत विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. परंतु ४ वर्षे लोटूनही ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यात आले नाही. सत्ताधारी पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी यावर बोलत नाही, अशी टीका निवेदनात राष्ट्रीय  ओबीसी युवा महासंघाने केली आहे. ओबीसी प्रवर्गात सुमारे पाचशेहून अधिक जातींचा समावेश असून, त्यांच्यासाठी असलेले अवघे ६ टक्के आरक्षण त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अतिशय नगण्य आहे. तसेच ते या प्रवर्गावर अन्याय करणारे आणि त्यांना मागासलेपणाच्या गर्तेत लोटणारे आहे. अत्यल्प आरक्षणामुळे शासनाने घोषित केलेल्या मेगा भरतीत ओबीसी प्रवर्गाच्या वाट्याला एकही जागा येणार नसून, ओबीसी युवक शिक्षण सोडून स्वत:ला मजुरी व शेतीच्या कामात झोकून देत आहेत. आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निवडणूक तसेच जनगणनेवरही बहिष्कार टाकण्यात आला. तरीही प्रश्नाला जाणीवपूर्वक बगल देण्यात आली. १४ आॅगस्टपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास  स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात अर्धनग्न अवस्थेत राष्ट्रध्वजाला सलामी देतील आणि यानंतरही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाने दिला आहे.