स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या तीन

0
13

गोंदिया,दि.13 : सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे तीन रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्यविभागाने दिली आहे. यामुळे जिल्हावासीयांतही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. र्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम जानव्हा येथील सत्यभामा मेंढे (४५) यांना २६ आॅगस्ट रोजी हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना भंडारा येथील प्रयास हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बोंडगाव येथील तेजस्वीनी एम. हटवार (२०) या महिलेला १ सप्टेंबर रोजी हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
तर सालेकसा तालुक्यातील ग्राम गोर्रे येथील कुवरलाल जी. बिसेन (४६) यांना ६ सप्टेंबर रोजी हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. स्क्रब टायफस या जीवाणूचे नाव ओरीयंटा टूशूगामुशी असे आहे. अफगानीस्तान, पाकीस्तान, रशीया, जपान, ब्रम्हदेश आणि भारतात तो आढळतो. भारतात हिमाचल प्रदेशमध्ये या आजाराचे रूग्ण प्रामुख्याने आढळतात.
स्क्रब टायफसच्या आजार कीटक चावल्याने होतो. कीटक ज्या ठिकाणी चावतो त्या ठिकाणी छोटासा अल्सर तयार होतो. ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, लिंफ नोड सुजणे, कोरडा खोकला, अंगावर रॅश उठणे, न्युमाोनिया, मेंदूज्वर सदश लक्षणे या आजाराची असतात.
असा करावा उपचार
शेतकरी, शेतात काम करणारे मजूर, जंगलात गाई चारणारे गुराखी यांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. यावर माईट नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा, झाडेझुडपात काम करताना पूर्ण बाह्यांचे पायघोळ कपडे वापरावेत, कपडे, अंथरून पांघरूणावर किटकनाशक औषधांचा वापर करावा, खुल्या जागेत शौचास जाणे टाळावे, झाडझुडूपात काम करून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत, स्क्रब टायफसचे रूग्ण आढळून आलेल्या रूग्णांच्या घराच्या अवती-भवती असलेली झाडे झुडूप काढून टाकावीत, चिगार आढळून आलेल्या ठिकाणी जमिनीची नांगरणी तसेच जमिनीवरील सर्व पालापाचोळा जाळून टाकावा पाळीव प्राणी व पोल्ट्री बर्डस असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवाव्या.