पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून जवान सुनील धोपे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0
30

वाशिम, दि. १९ : सीमा सुरक्षा दलाचे कारंजा लाड येथील मृत जवान सुनील धोपे यांच्या कुटुंबियांची आज पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सुनील धोपे यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची चौकशी करण्याबाबत व सुनील धोपे यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच सुनील धोपे यांचे पार्थिव स्वीकारून त्यावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती कुटुंबियांना केली.यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार रणजीत भोसले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राठोड यांनी सुनील धोपे यांच्या पत्नी सविता धोपे तसेच आई, वडील व भाऊ यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुनील धोपे या जवानाच्या मृत्यूमुळे धोपे कुटुंबियांचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेही नुकसान झाले आहे. धोपे कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगून श्री. राठोड म्हणाले की, सुनील धोपे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांविषयी सखोल चौकशी करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच धोपे कुटुंबीयांनी उपस्थित केलेले मुद्दे, त्यांच्या मागण्या लेखी स्वरुपात राज्य शासन व केंद्र शासनाला पाठविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.