गोवर रुबेला मोहिम यशस्वीतेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
19

गोंदिया ,दि.१९ः: महाराष्ट्राला गोवर रुबेला मुक्त करण्यासाठी शासन लसीकरण मोहिम राबविणार असून प्रत्येकानी आपली जबाबदारी समजून समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन ही मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गोवर रुबेला मोहिमेचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सध्या गोवर व रुबेला हे आजार बालकांच्या दृष्टीने सर्वात हानिकारक आजार आहे. याकरीता भारत सरकारने सन २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मुलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजपर्यंत २१ राज्यात हे लसीकरण झाले असून ४० कोटी बालकांना लस देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील ६ कोटी ७ लाख बालकांना लस नोव्हेंबरपासून देण्यात येणार असून त्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात नोव्हेंबर २०१८ मध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहिम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३,८५,६१७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. निश्चित लाभार्थ्यांपैकी जरी या अगोदर गोवर रुबेला लस दिली असेल तरी त्या बालकांना लसीकरण करावयाचे आहे. मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर ४ ते ५ आठवड्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार असून निर्धारीत करण्यात आलेल्या एकूण लाभार्थीपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे विद्यार्थी असल्यामुळे आरोग्य विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये पहिल्या २ ते ३ आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत ३५ ते ४० टक्के लाभार्थीचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमीत लसीकरण सत्राच्या किंवा उपकेंद्राच्या ठिकाणी करण्यात येईल.
या मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन देण्यात येणार असून ग्रामीण व नागरी भागामध्ये १०० टक्के लाभार्थ्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेमध्ये शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण, गृह, अल्पसंख्यांक, माहिती व प्रसारण, रेल्वे इत्यादी विभागाची ही मोहिम यशस्वी करण्यासाठी महत्वाची भूमिका आहे. खाजगी शाळांचे कार्यकारी समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक तसेच जिल्ह्यात वैद्यकीय सेवा पुरविणारे सर्व विभाग अत्यंत महत्वाचे आहे.
सभेला बाहय संपर्क अधिकारी डॉ.राऊत, डॉ.एन.के.जायस्वाल, प्रमोद गुळधे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) एल.एम.मोहबंशी, डॉ.पराडकर, डॉ.विशाल काळे, डॉ.वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एम.आर.रामटेके, डॉ.एफ.ए.मेश्राम, डॉ.सी.डब्लू.वंजारे, डॉ.राऊत, डॉ.मोहने, डॉ.कुकडे तसेच जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एस.पी.चौव्हाण यांनी सहकार्य केले. संचालन जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले.