नक्षलवाद भारतासाठी अभिशाप – आनंद मिश्रा

0
7

नागपूर दि. 21 – नक्षलग्रस्त भागात बोलण्याची मुभा नाही. जो बोलतो त्याला जगण्याचा अधिकार नसतो. तेथे आदिवासींवर अत्याचार होतात. हाच आदिवासी नक्षल्यांच्या विरोधात उभा ठाकला असता तर छत्तीसगडमधील नक्षलवाद संपुष्टात आला असता. आता नक्षलवाद भारतासाठी अभिशाप ठरल्याचे मत अधिवक्‍ते आनंद मिश्रा यांनी व्यक्‍त केले.

भूमकाल संघटनेच्या वतीने बुधवारी आयोजित ‘शहरी नक्षलवाद…संपणार का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, वक्‍ता म्हणून अधिवक्‍ते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद मिश्रा, पत्रकार सुनील खोब्रागडे, भूमकाल संघटनेचे अध्यक्ष प्रा. अरविंद सोहनी होते. मिश्रा यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर भाष्य करताना बस्तरमधील नक्षल चळवळीची आणि कारवाईची माहिती दिली.नक्षलग्रस्त भागातील ‘जल, जमीन आणि जंगल’ आमचेच असून, पोलिस आमच्यावर हिंसा करतात, असे नक्षल्यांना वाटते. म्हणून नक्षलवादी विचारांचे लोक शांतीयात्रा काढतात. मात्र, आता कम्युनिस्ट नक्षलवादाचा विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासींविरुद्ध खटले दाखल झाल्यानंतर त्यांना कुणी वाचवायलाही येत नाही. खरे नक्षलवादी कायद्याच्या सापळ्यात अडकल्यानंतर मात्र त्यांची सुटका करण्यासाठी महागड्या वकिलांची फौज उभी केली जाते. परिणामी आधी शहरी नक्षलवाद्यांना संपवले पाहिजे. त्यानंतर जंगलातील नक्षलवादी आपोआप संपतील, असे मिश्रा यांनी पुढे बोलताना सांगितले.
अलीकडे कारवाई करण्यात आलेल्या शहरी नक्षलवाद्यांचा कोरेगाव भीमातील घटनेशी संबंध जोडणे योग्य वाटत नाही. त्यांना या घटनेसाठी जबाबदार धरले जात असल्यामुळे प्रकरण कमकुवत झाले आहे. त्यांच्याविरुद्ध पंतप्रधानांना ठार मारण्याचा कट रचण्यासारखे महत्त्वाचे पुरावे आहेत. केवळ याच आधारावर त्यांना शिक्षा केली जाऊ शकते, याकडे मिश्रा यांनी लक्ष वेधले.शहरी व ग्रामीण नक्षलवाद असा भेद करणे चुकीचे आहे. हा भेद करणे हेच राजकारण आहे, असे मत देवेंद्र गावंडे यांनी व्यक्त केले तर, नक्षली चळवळ देशाच्या व समाजाच्या विकासाकरिता घातक ठरत आहे, असे अरविंद सोहनी यांनी सांगितले. संघटनेचे सचिव श्रीकांत भोवते यांनी प्रास्ताविक केले.