आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे ग्रामीण भागात दर्जेदार उपचार मिळणार- ना. प्रकाश जावडेकर

0
40

· शेंदुरजना अढाव आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

वाशिम, दि. २3 : प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जान्नोती करून ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’मुळे ग्रामीण भागातील सर्सामान्य नागरिकांना वेगेवेगळ्या १२ प्रकारच्या आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होईल. यामाध्यमातून स्थानिक पातळीवरच दर्जेदार औषधोपचार मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. मानोरा तालुक्यातील शेंदूरजना अढाव येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, आमदार राजेंद्र पाटणी, भारत सरकारच्या शिपिंग कार्पोरेशनचे संचालक तथा माजी आमदार विजय जाधव, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. जावडेकर म्हणाले, वाशिम हा विकासाची आकांक्षा असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याला विकसित करण्यासाठी ‘आकांक्षित जिल्हा’ अभियानाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. रस्ते, सिंचन सुविधा निर्मितीसह शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत असल्याचे सांगून श्री. जावडेकर म्हणाले की, गरीब कुटुंबियांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आरोग्यविषयक सुविधा देणारी ‘आयुष्मान भारत’या क्रांतिकारी योजनेची केली आहे. या योजनेतून गरीब कुटुंबातील व्यक्तींना पाच लाख रुपयांपर्यंतचा औषधोपचार मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांच्या आजाराचे वेळीच निदान होऊन त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळाल्यास तो कमी खर्चात व कमी कालावधीत बरा होतो. त्यामुळे स्थानिक पातळीवर चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरु करण्यात आली असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खा. धोत्रे म्हणाले, आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून आजूबाजूच्या नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी मदत होणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांमुळे विकासाला गती मिळाली असून ‘आकांक्षित जिल्हा’ अभियानातून वाशिम जिल्ह्यातील रस्ते, आरोग्य, जलसंधारणाच्या कामांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.

आमदार पाटणी म्हणाले, वाशिम जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून रस्ते विकासाची कामे जिल्ह्यात सुरु आहेत. तसेच केंद्र सरकारने पोहरादेवी येथून नवीन रेल्वे मार्ग मंजूर केला असून या रेल्वे मार्गाचे कामही गतीने सुरु आहे. जिल्ह्यात सुरु झालेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण होऊन त्यांचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

श्री. ठाकरे म्हणाले, आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सुविधा संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे शेंदूरजना अढाव व आसपासच्या दुर्गम परिसरातील नागरिकांना स्वस्त व चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, उप विभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व आसेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.