जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत आरोग्य विषयक प्रश्नांवर चर्चा

0
13

वाशिम, दि. २५ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा आज जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी नागरिकांच्या आरोग्य विषयक प्रश्नांसह इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. धोत्रे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, बीएसएनएलचे उपविभागीय अभियंता एन. एस. टेकाडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, अशासकीय सदस्य वीरेंद्रसिंह ठाकूर, गजानन साळी, सुधीर देशपांडे, अभय खेडकर, संतोष वाघमारे, नामदेव बोरचाटे, प्रसन्न पळसकर, वनमाला पेंढारकर, प्रा. डॉ. शुभांगी दामले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवा सुधारण्याचा मुद्दा अशासकीय सदस्यांनी या बैठकीत मांडला. कारंजा उपजिल्हा रुग्णालय, वाशिम सामान्य रुग्णालयात रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्याची कार्यवाही करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयातील ज्येष्ठ नागरिक खिडकी सुरु करावी. तसेच जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी अशासकीय सदस्यांनी त्यांनी केली. यावेळी डॉ. धोत्रे यांनी म्हणाले की, या तक्रारींचा पाठपुरावा करून त्या सोडविण्याची कार्यवाही त्वरित करण्यात येईल. कारंजा उपजिल्हा रुग्णालयाला लवकरच प्रत्यक्ष भेट देवून तेथील समस्या सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. याविषयी माहिती देताना डॉ. आहेर म्हणाले की, नुकत्याच झालेल्या ‘दिशा’ समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही करून कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळेपर्यंत पर्यायी रुग्णवाहिका वापरण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच १०८ रुग्णवाहिकेची सेवा सुद्धा उपलब्ध असल्याने रुग्णांना कोणतीही समस्या येणार नाही. जिल्ह्याला नवीन रुग्णवाहिका मिळाल्यास ती प्राधान्याने कुपटा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्यात येईल.

फळे पिकविण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर, जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर फ्री एअर व इतर आवश्यक सुविधा नसल्याबाबत व इतर विषयांवरही या सभेत चर्चा करण्यात आली.