बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची व्यापक जनजागृती करा-लक्ष्मीनारायण मिश्रा

0
15

वाशिम, दि. २५ : स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसृतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेटी बचाओबाबत चळवळ उभी झाली आहे. आज समाजाच्या सर्वांगीण हितासाठी बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या अभियानाची व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक  सभागृहात २४ सप्टेंबर रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्यानिमित्ताने आयोजित सभेत श्री. मिश्रा बोलत होते.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. इंगळे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, परीविक्षा अधिकारी गजानन जुमळे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.श्री. मिश्रा म्हणाले, जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात व परिसरात बेटी बचाओचे पोस्टर्स लावावेत. प्रत्येक तालुक्यात महिला सरपंच मेळावे घ्यावेत. आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचे देखील मेळावे घेऊन व्यापक प्रमाणात अभियानाची जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.

श्री. मोहुर्ले म्हणाले, बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानांतर्गत जिल्ह्यात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सरपंच महिलांचे मेळावे घेण्याचे नियोजन असून विशेष कार्य करणाऱ्या तसेच मोठ्या पदांवर कार्यरत असणाऱ्या महिलांचे मार्गदर्शन घेण्यात येईल. या अभियानाचे पोस्टर्स, बॅनर्स जिल्ह्यात विविध ठिकाणी लावण्यात येतील. महिलांची मोटार बाईक रॅली, रोड शो, कलापथकांचे आयोजन, चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्याआधी लेक वाचवा लघु चित्रपट दाखविण्याचे नियोजनासोबत अन्य प्रकारचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.