अंनिसने केला जादूटोणा व भूतबाधेसंबंधी गैरसमज दूर

0
8

नवेगावबांध(सतिश कोसरकर)दि.28ः- जादूटोणा व भूतबाधोचे कारण सांगून लोकांकडून उपचाराच्या नावावर पैसे उकळणार्‍या मांत्रिकाचा अंधर्शध्दा निर्मूलन समितीने भांडाफोड केला. जवळील ग्राम ब्राम्हणटोला येथे अनिसने हा यशस्वी प्रयोग केला असून गावकर्‍यांना जादूटोणा व भूमबाधेवर मार्गदर्शन केले.
अर्जुनी मोरगावापासून ७ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या ग्राम ब्राम्हणटोला येथे कांबळे नावाचा मांत्रिक सोमवार व गुरुवारी दरबार भरवून जादूटोणा व भूतबाधेच्या नावावर लोकांची फसवणूक करीत होता. भूतबाधा केली. आजारी आहे. मुले शाळेत जात नाही, लग्ने जुळत नाही अशा प्रकारचे प्रश्न घेऊन गाव व बाहेरील लोक यायचे. याचाच गैरफायदा घेत मांत्रिक गावातील कोणत्याही व्यक्तीचे नाव घेत त्याने तुला जादू केली असे सांगूण भांडणे लावून घ्यायचा. त्यामुळे मागील एक वर्षापासून गावात तणावाचे वातावरण होते.
गावातील लोकांकडून भूतबाधा उतरविण्यासाठी मांत्रिक पैसेही उकळायचा असेही गावातील लोकांच्या स्वाक्षरीचे एक निवेदन अंनिस व अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यात दिले होते. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अंनिसचे संघटक प्रा. बी.डी. फुलकटवार हे सोमवारी (दि.१७) रुग्ण म्हणून दरबारात मांत्रिकाकडे गेले. तेव्हा त्यांना पुडीत अंगारा देवून सकाळ-दुपार-संध्याकाळ तीन दिवस घेण्यास सांगण्यात आले.
त्यांनी गावकर्‍यांसमक्ष मांत्रिक तसेच ज्यांनी जादू केली ज्यांना भूतबाधा झाली अशा सर्वांना समाज मंदिरात बोलावून प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. मांत्रिकाने आता दरबार भरवून लोकांची फसवणूक करणार नाही असे सांगितले. त्यांना भूतबाधा झाली त्यांना मानसोपचार तज्‍जञाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. यासंदर्भात गोंदिया जिल्हाध्यक्ष एस.एस. चव्हाण, डॉ. पी.आर. भानसे, प्रा.बी.डी. फुलकटवार, प्रा. सत्पुरूष शहारे, भिमराव मोटघरे यांनी प्रबोधन करून जादूटोणा व भूतबाधेसंबंधित गैरसमज दूर केले. तसेच जादूटोणा कायद्यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन केले. याकरिता ब्राम्हणटोलाचे सरपंच अनिता खोब्रागडे, उपसरपंच र्शावण मेंढे, तंमुस अध्यक्ष किशोर बिलकडे, सदस्य नंदा चंद्रभागा चुलपार, विनायक रोखडे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे सहकार्य मिळाले. याप्रसंगी गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते