लाखनी तहसील कार्यालयावर धडक भजन आंदोलन

0
14
लाखनी,दि.२६ः- लाखनी येथील मारोती देवस्थान गुजरी चौक येथील मंदिर समितीच्या १0 एकर जमिनीवर जेएमसी उड्डाणपूल बांधकाम करणार्‍या कंपनीचा अवैध ताबा करण्यात आला आहे. भिवराबाई गणपती शेटे भांडारकर यांनी १९६७ ला मृत्यू पत्रात मंदिर समितीला १0 एकर जमीनदान केली होती. आजवर या शेतीतून मंदिर समितीला उत्पन्न मिळत होते आणि त्यातून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. या मंदिर समितीची जागा लाखनी येथील व्यापारी मधुकर गणपत हेडाऊ यांनी जून २0१८ ला कोणत्याही समिती सदस्य व ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता ४ लाख पन्नास हजार रुपयांना लीजवर देण्यात आली.
मंदिर समिती ही धर्मदाय असल्यामुळे धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेणे आवश्यक होते. परंतु, त्याबाबत कुठलीही परवानगी घेतली नाही. या गोष्टींचा निषेध म्हणून २६ ऑक्टोबर रोजी भजन दिंडी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात ग्रामस्थ भजन आणि पोवाडे गाऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त करणार आहेत. जेएमसी कंपनीचे बांधकाम तात्काळ थांबवावे. तहसील कार्यालय व नगरपंचायत कार्यालय मार्फत देण्यात आलेल्या सर्व तात्पुरत्या परवानग्या रद्द करण्यात याव्यात. तहसीलदार, लाखनी मुख्याधिकारी नगरपंचायत, लाखनी तथा मधूकर गणपत हेडाऊ यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.