नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार

0
18
  • इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा

वाशिम, दि. २६ : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या संपूर्णतः निवासी स्वरूपाच्या वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात इयत्ता ६ वी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वरुपात स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी या निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी व पालकाची स्कॅन केलेली सही, विद्यार्थाचे जेपीजी फॉर्मेटमधील छायाचित्र, इयत्ता ५ वीमध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील स्कॅन  केली सर्टिफिकेट, या सर्टिफिकेटचा नमुना जवाहर नवोदय विद्यालयाच्याwww.jnvwashim.in या संकेतस्थळावर डाऊनलोड (download link) मध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्याचा कालावधी २३ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ हा आहे.

ही परीक्षा ६ एप्रिल २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होणार असून परीक्षेचे हॉल तिकीट १ मार्च २०१९ पासून डाऊनलोड करता येतील. प्रवेश अर्ज भरण्याबाबत अधिक माहिती www.jnvwashim.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी वाशिम जवाहर नवोदय विद्यालय येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी कळविले आहे.