अर्जुनी मोर पंचायत समितीला विभागस्तरीय व्दितीय पुरस्कार

0
14
‘पंचायत राज’च्या यशस्वितेबद्दल राज्यपालांनी केले ग्रामविकास विभागाचे कौतुक

गोंदिया,दि.27ः- यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी गौरव समारंभ मुंबई येथे शुक्रवारला पार पडला.या कार्यक्रमात नागपूर विभागातून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समितीला व्दितीय क्रमांकाचा पुरस्कार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला.हा पुरस्कार अर्जुनी मोरगावचे पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर,गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार,उपसभापती करुणाताई नांदगावे,माजी उपसभापती आशा झिलपे,पं स सदस्या अर्चनाताई राऊत,विनोद गोबाडे यांनी स्विकारला.गटविकास अधिकारी जमईवार यांच्या कार्यकाळात या पंचायत समितीने विकासात्मक योजनां राबविण्यात चांगला पुढाकार घेतला असून गेल्या दोन वर्षापासून सातत्याने विभागस्तरावर पंचायत राज पुरस्कार अभियानात यश मिळविले आहे.यापुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी राज्यात शासनाच्या अनेक विकास योजना ह्या पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविल्या जात आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले. राज्यात पंचायत राज अभियान अतिशय उत्तम पद्धतीने राबविल्याबद्दल राज्यपालांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाचे यावेळी विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेला 25 लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे सिंधुदुर्ग आणि अमरावती जिल्हा परिषदेला प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध विभागस्तरीय पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले