स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला शोध क्षमतेचा,ग्रामीण उर्जेचा अंतर्गत तिसरे सत्र यशस्वीरित्या संपन्न

0
27

गोंदिया दि.१८.: शासन स्तरावर वेगवेगळ्या विभागाच्या नोकरभरती संबंधात जाहिरात प्रकाशित करण्यात येते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सदर भरतीबाबत माहिती नसते. परीक्षा कशा द्याव्यात, अभ्यास कसा करावा याची माहिती राहत नाही. सदर माहिती मिळविण्याकरीता जिल्हा प्रशासनामार्फत मा.मुख्यमंत्री यांनी जाहिर केलेल्या मेगा भरतीच्या अनुषंगाने प्रत्येक आठवड्यात स्पर्धा परीक्षाबाबत शोध क्षमतेचा, ग्रामीण उर्जेचा ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
सदर व्याख्यानमालेचे तिसरे सत्र १६ नोव्हेंबर रोजी गृह विभाग, महसूल विभाग व बँकींग तसेच इतर क्षेत्रातील रोजगाराच्या संधी तसेच परीक्षेची तयारी कशी करावी, त्यातील बारकावे कसे समजून घ्यावे याचे सविस्तर मार्गदर्शन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय गोंदिया येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम, गटविकास अधिकारी रोहिनी बाणकर, जि.प.उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अश्विनी नराजे व आयडीबीआय बँकेचे सहायक व्यवस्थापक नितीन संघड उपस्थित होते.
या व्याख्यानमालेमध्ये श्रीमती कदम यांनी शासनाच्या विविध विभागाच्या पद भरतीच्या अनुषंगाने प्रश्नांचे विस्तृत मार्गदर्शन केले. श्री.संघड यांनी बँकीग क्षेत्रातील विविध परीक्षांच्या तयारीबाबत सुक्ष्म बारकावे समजावून सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. श्रीमती बाणकर यांनी कठीण परिश्रमातून तसेच सातत्य ठेवून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये कसे यश मिळवावे तसेच सराव परीक्षांच्या माध्यमातून आपल्या चुका दुरुस्त करुन परीक्षेला आत्मविश्वासाने कसे सामोरे जावे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. श्रीमती नराजे यांनी पद भरतीबाबत आपल्या गुणवत्तेला कशाप्रकारे संधी उपलब्ध करुन द्यावी तसेच मुलाखतीचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी कसे अवगत करावे याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन करुन उपस्थितांचे आभार समाज कल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी मानले.