ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत विविध विषावर चर्चा

0
8

वाशिम, दि. १९ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक तेवढया प्रमाणात विज पुरवठा होत नसल्यामुळे तसेच एकाच रोहित्रावर अनेक कृषिपंप कनेक्शन असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. या प्रश्नाची तातडीने सोडवणूक करुन शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने न्याय द्यावा. तसेच वीज वितरण कंपनीशी संबंधित विषयावर उत्तर देण्यासाठी स्वत: कार्यकारी अभियंता यांनी उपस्थित रहावे. प्रतिनिधी पाठवू नये, असे सदस्यांनी सुचविले. राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा पिक कर्ज देतांना शेतकऱ्यांकडून विविध बॅंकांचे नो ड्युज सर्टिफिकेट मागतात तसेच हे सर्टिफिकेट देतांना पैशाची मागणी करतात, तेव्हा असे प्रकार बंद व्हावेत आणि नो ड्युज सर्टिफिकेटची आवश्यकता नसल्याचे माहिती फलक बँकेच्या दर्शनी भागात लावावेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचेल अशी सुचना काही सदस्यांनी केली.

शहरातील हॉटेल्समध्ये ग्राहकांना शुद्ध पाणी हॉटेल मालकांनी उपलब्ध करुन द्यावे. शुध्द पाणी उपलब्ध असल्याचे बोर्ड हॉटेल मालकांनी दर्शनी भागात लावण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने परिपत्रक काढण्याची सुचना संबधित विभागाला यावेळी करण्यात आली. वाशिम शहरात अनेक ठिकाणी लावलेले अनावश्यक गतीरोधक काढण्यात यावे तसेच आययुडीपी कॉलनीतील सिमेंट रस्त्यावर लावण्यात आलेले गतीरोधक सुध्दा नगर पालीकेने काढण्याची कार्यवाही तातडीने करावी. जिल्हाधिकारी यांनी ऑगस्ट महिन्यात हे गतीरोधक काढण्याचे निर्देश दिल्याकडे उपस्थित काही  सदस्यांनी लक्ष वेधले. बैठकीत अन्य काही विषयांवर चर्चा झाली. सभेत जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे संबंधित विविध समस्यांची विभाग प्रमुखांनी सोडवणुक करुन ग्राहकांना न्याय मिळवुन देण्याचे सांगितले.

बैठकीत ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य सुर्वश्री धनंजय जतकर, भागवत कोल्हे, डॉ. एम. एम. संचेती, कृष्णा चौधरी, अलका पाटील, प्रा. डॉ. शुभांगी दामले,प्रविण वानखेडे, सुधीर देशपांडे, गजानन साळी, एल.जी घोडचर यांचेसह समितीचे शासकीय सदस्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, विज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी उप कार्यकारी अभियंता समीर देशपांडे, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी सहायक पोलीस निरिक्षक विनायक जाधव, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांचे प्रतिनिधी दिपक तारसे, कृषि उपसंचालक आर. एस. कदम, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सलीम सय्यद, बी. बी. गायकवाड, नगरपालीकेचे के. एस. अग्रवाल, अन्न सुरक्षा अधिकारी, सहायक पुरवठा अधिकारी सुनील देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.