गोंदिया,दि. २०: आरक्षणासह न्याय, हक्काच्या मागणीसाठी नागपूर येथिल विधानभवनावर २३ नोव्हेंबर १९९४ रोजी आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात लाठीचार्ज झाल्याने चेंगराचेंगरी होवून ११४ आदिवासी गोवारी समाजबांधव शहीद झाले. या घटनेला २४ वर्षे पूर्ण होत आहे. तरीपण समाजाच्या समस्या कायम असून या मागण्यासह शहिदांना श्रध्दाजंली अर्पण करण्यासाठी २३ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात समाजाबांधंवानी मोठ्या संख्येत उपस्थित व्हावे, असे आवाहन आदिवासी गोवारी समाज संघटन जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने करण्यात आले आहे.
१ एप्रिल १९८५ चा जीआर रद्द करण्यासाठी २२ एप्रिल १९९३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. पण त्यात निर्णय निघाला नाही. त्यातच केंद्रीय समाजकल्याण मंत्री यांच्याकडे पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली. परंतु, आदिवासी आमदारांच्या दबावामुळे राज्यशासनाने केंद्र शासनाला माहिती दिली नाही. त्यानंतर शासनाच्या विरोधात टप्याटप्प्याने धरणे आंदोलन सुरू झाले. अशातच २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात गोवारी समाजबांधवांनी भव्य मोर्चा काढला. मात्र या मोर्च्याला गालबोट लागून ११४ गोवारी समाज बांधवांना शहिद व्हावे लागले. न्यायालयाने काही दिवसापूर्वीच गोवारी समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय दिला. पण त्या निर्णयाची अंमलबजावणी शासनातर्पेâ अद्यापही झाली नाही. यासह समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. तेव्हा शहिदांना श्रध्दांजली व मागण्यांच्या पुर्ततेसाठी २३ नोव्हेंबर रोजी आयोजित श्रध्दाजंली कार्यक्रमात जिल्ह्यातील आदिवासी गोवारी समाजबांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन माधव चचाणे, गुलाब नेवारे, राधेश्याम कोहळे, का.ज.गजबे, सुशिल राऊत, मोहन शहारे, ज्ञानेश्वर राऊत, सुशिल शहारे, डी.टी.चौधरी, प्रविण चौधरी, विजू भोयर, अशोक नेवारे, खेमचंद राऊत, बळीराम, सुरेश वाघाडे आदिंने केले.





