सिरोलीपरिसरात बिबट्याने केल्या चार शेळ्या फस्त

0
16

अर्जुनी मोरगाव,दि.21ः- तालुक्यातील महागाव सिरोली परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बकऱ्यांचा फडशा पाडत असून आतापर्यंत या बिबट्याने चार शेळ्या फस्त केल्या आहेत. भक्ष्याच्या शोधात बिबट्या कधीही वस्तीत घुसण्याचा धोका वाढला असल्याने महागाव सिलोलीवासीयांनो सावधान, गावाबाहेर एकट्याने फिरू नका. आपल्या पाळीव प्राण्यांना मोकाट सोडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील गाव-वाड्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

महागाव सिरोली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली असून सध्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याने आपले लक्ष केंद्रित केले आहे. या बिबट्याने सिरोली गावातील शिवराम मस्के, जगण शेंद्रे, आनंदराव मस्के, तुळशिदास सोनवाने, यांच्या प्रत्येकी एक प्रमाणे चार बकऱ्या फस्त केल्या. गेल्या आठ दिवसांपासून सिरोली परिसरात बिबट्याची दहशत वाढल्याने गावातील गोधन पालकांमधे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. बिबट्याच्या दहशतीची सूचना गावातील सामाजिक कार्यकर्ते व बाजार समितीचे संचालक प्रदीप मस्के यांनी वनविभागाला दिली असून बिबट्याने ठार केलेल्या बकरी मालकांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही प्रदीप मस्के यांनी केली आहे. महागाव सिरोली गावानजीक नवेगावबांध उद्यान असल्यामुळे या अगोदर या भागात बिबट्याची दहशत अनेकांनी अनुभवली आहे. त्यामुळे लगेच वनविभागाने त्या बिबट्याची वाढलेली दहशत वेळीच आटोक्यात आणण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे..