संजयनगर अतिक्रमणधारकांना लवकरच मालकी हक्क

0
17

गोंदिया,दि.22 : गोंदिया शहरातील संजयनगर (गोंविदपूर) येथील ६.५३ हेक्टर क्षेत्र झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी राज्याच्या महसूल विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर महसूल विभागाने सदर क्षेत्र झुडपी जंगलातून मुक्त करण्यासाठी शिफारशीसह मंजुरीकरिता केंद्र शासन व वन आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला होता. केंद्र सरकारने सदर क्षेत्र झुडपी जंगलातून मुक्त करण्याचे संकेत दिले असून यामुळे संजयनगर (गोंविदपूर) येथील ६०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शहरातील संजयनगर (गोंविदपूर) हा परिसर झुडपी जंगलाच्या जागेवर वसलेला आहे. आ.अग्रवाल यांनी येथील अतिक्रमणधारकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे मिळण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. २००९ मध्ये जिल्हा प्रशासनाने आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्याची दखल घेत या परिसरातील नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रस्ताव मंजुरीेसाठी शासनाकडे पाठविला. त्यानंतर संजयनगर येथील प्रत्येक घराचे नकाशे तयार करण्यात आले. मात्र सदर जागा ही झुडपी जंगलाची असल्याने मालकी हक्क पट्टे वाटपाची प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर आ.अग्रवाल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन सदर क्षेत्र झुडपी जंगलातून मुक्त करुन येथील नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे वाटप करण्याची मागणी लावून धरली. ९ एप्रिल २०१८ ला संजयनगर येथे आमसभा घेऊन येथील ६०० नागरिकांना जमिनीचे मालकी हक्क पट्टे वाटपाचा निर्णय घेतला. सदर जमिनीची झुडपी जंगलातून मुक्तता करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून केंद्र शासन व वन मंत्रालयाने तसे संकेत दिले आहे. त्यामुळे संजयनगर येथील ६०० नागरिकांना जमिनीेचे मालकी हक्क पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.